आशीष गावंडे अकोला, दि. २१- मुलींचा जन्मदर वाढावा, यासाठी पीसीपीएनडीटी कायदा अमलात आणल्यानंतरही काही व्यावसायिक डॉक्टर गर्भलिंग निदान चाचणी करतात. मुलींच्या घटत्या जन्मदराची गंभीर दखल घेत महापालिका प्रशासनाने शहरातील ११७ खासगी हॉस्पिटलची तपासणी सुरू केली आहे. यामध्ये प्रामुख्याने स्त्रीरोग तज्ज्ञांची रुग्णालये रडारवर असल्याची माहिती आहे. वंशाचा दिवा पदरात पाडून घेण्याच्या मानसिकतेतून आजही गर्भलिंग निदान चाचणी केली जाते. त्याचा परिणाम मुलींच्या घटत्या जन्मदरावर होत आहे. पैशांच्या हव्यासापायी अनेक व्यावसायिक डॉक्टर गर्भलिंग निदान चाचणीची कामे गोपनीयरीत्या पार पाडतात. काही डॉक्टरांकडे प्रमाणित पदवी नसतानाही त्यांनी गर्भलिंग निदान चाचणीची सर्रास दुकाने थाटल्याची प्रकरणे राज्यात उजेडात आली आहेत. स्त्री भ्रूणहत्या रोखण्यासाठी सर्वसामान्यांपासून ते माध्यमांपर्यंत जनजागृती करणे तसेच पीसीपीएनडीटी कायद्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा प्रशासनासह महापालिकेची वैद्यकीय आरोग्य यंत्रणा सरसावली आहे. शहराच्या विविध भागात २४७ खासगी हॉस्पिटल आहेत. तशी नोंद मनपाकडे उपलब्ध असून, यापैकी ११७ हॉस्पिटल स्त्रीरोग तज्ज्ञांची आहेत. ज्या खासगी हॉस्पिटलला गर्भपाताच्या चाचणीचे अधिकार देण्यात आले आहेत, अशा हॉस्पिटलची तपासणी महापालिकेच्या वैद्यकीय आरोग्य यंत्रणेने सुरू केली आहे. १६ मार्चपासून सुरू झालेल्या धडक मोहिमेत आजपर्यंत सात हॉस्पिटलची तपासणी करण्यात आली असून, ही मोहीम १५ एप्रिलपर्यंत सुरू राहील. यामध्ये मनपाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. फारूख शेख, डॉ. प्रभाकर मुद्गल, डॉ. छाया देशमुख, डॉ. छाया उगले, डॉ. अस्मिता पाठक, डॉ. वासीक अली यांच्यासह अन्न व औषधी विभागाचे निरीक्षक अवसे यांचा समावेश आहे.
११७ रुग्णालय मनपाच्या रडारवर
By admin | Published: March 22, 2017 2:46 AM