अकोला: जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत २०१८-१९ या वर्षात जिल्ह्यातील विविध विकास कामांसाठी १३८ कोटी ३७ लाख रुपयांचा निधी संबंधित यंत्रणांना वितरित करण्यात आला असला, तरी त्यापैकी १० मार्चपर्यंत १२६ कोटी रुपयांचा निधी खर्च करण्यात आला आहे. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू असल्याने, उर्वरित १२ कोटी ३७ लाख रुपयांचा निधी मार्च अखेरपर्यंत खर्च होणार नसल्याने जिल्ह्यातील विकास कामांचा हा निधी अखर्चित राहणार असून, उपलब्ध निधीतील विकास कामेही लांबणीवर पडणार आहेत.२०१८-१९ या वर्षांत जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) अंतर्गत जिल्ह्यातील विविध विकास कामांसाठी १३९ कोटी ५१ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. मंजूर निधीपैकी १३८ कोटी ४० लाख रुपयांचा निधी शासनामार्फत प्राप्त झाला. उपलब्ध निधीपैकी १३८ कोटी ३७ लाख रुपयांचा निधी संबंधित यंत्रणांना विकास कामांसाठी वितरित करण्यात आला असून, त्यापैकी १० मार्चपर्यंत १२६ कोटी रुपयांचा निधी विकास कामांवर खर्च करण्यात आला. उर्वरित १२ कोटी ३७ लाख रुपयांचा निधी अद्याप अखर्चित आहे. लोकसभा निवडणुकीची आदर्श आचारसंहिता १० एप्रिलपासून लागू झाल्याने आचारसंहिता कालावधीत नवीन विकास कामे करता येणार नाहीत. त्यामुळे जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत विकास कामांसाठी वितरित केलेल्या निधीपैकी १२ कोटी ३७ लाख रुपयांचा निधी मार्च अखेरपर्यंत खर्च होऊ शकणार नाही. अखर्चित निधीतील विकास कामे लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपुष्टात येईपर्यंत लांबणीवर पडणार असल्याची स्थिती आहे.जिल्हा वार्षिक योजनेच्या निधीचे असे आहे वास्तव!-मंजूर निधी : १३९ कोटी ५१ लाख रुपये.-प्राप्त निधी : १३८ कोटी ४० लाख रुपये.-वितरित निधी : १३८ कोटी ३७ लाख रुपये.- खर्च झालेला निधी : १२६ कोटी रुपये.-अखर्चित निधी : १२ कोटी ३७ लाख रुपये.