अकोला : कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग नियंत्रित करण्यासाठी लागू करण्यात आलेल्या ‘लाॅकडाऊन’ कालावधीत गरिबांना मोफत धान्यवाटपाचा निर्णय राज्य सरकारने घोषित केला असून, यासंदर्भात शासनाचा आदेश १८ एप्रिल रोजी जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयाला प्राप्त झाला आहे. त्यानुसार, जिल्ह्यात प्राधान्य गट व अंत्योदय योजनेंतर्गत १२ लाख ७२ हजार ६१० गरीब शिधापत्रिकाधारक लाभार्थ्यांना मोफत धान्याचे वाटप गुरुवारपासून सुरू करण्याचे नियोजन जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयामार्फत करण्यात आले आहे.
कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग नियंत्रित करण्यासाठी राज्यात १४ एप्रिल रोजी रात्रीपासून लाॅकडाऊन घोषित करण्यात आले आहे. लाॅकडाऊनच्या कालावधीत प्राधान्य गट व अंत्योदय योजनेंतर्गत गरीब शिधापत्रिकाधारक लाभार्थ्यांना प्रत्येकी दोन किलो गहू व तीन किलो तांदूळ असे मोफत धान्यवाटप करण्याचे राज्य सरकारने जाहीर केले. त्यानुसार, मोफत धान्यवाटपासंदर्भात शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने १६ एप्रिल रोजी निर्गमित केलेला आदेश जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयाला १८ एप्रिल रोजी प्राप्त झाला. त्याअनुषंगाने सार्वजनिक वितरण व्यवस्थांतर्गत जिल्ह्यात प्राधान्य गटातील १० लाख ८३ हजार ११८ आणि अंत्योदय अन्न योजनेंतर्गत एक लाख ८९ हजार ४९२ अशा एकूण १२ लाख ७२ हजार ६१० गरीब लाभार्थी शिधापत्रिकाधारकांना मोफत धान्याचे वितरण करण्यात येणार आहे. गुरुवारपासून जिल्ह्यातील लाभार्थ्यांना मोफत धान्यवाटप सुरू करण्याचे नियोजन जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयाने केले आहे.
जिल्ह्यात अशी आहे लाभार्थ्यांची संख्या!
तालुका प्राधान्य गट अंत्योदय
अकोला शहर १९३३५६ ५५७५
अकोला ग्रामीण १९८३४८ २६९०९
बार्शीटाकळी १०५४६९ २७६६८
अकोट १२६४६५ ३२४०८
तेल्हारा ११०३१९ २७२६८
बाळापूर १३६६३५ २३६२८
पातूर ९१४६८ २०७८८
मूर्तिजापूर १२०९८६ २५२४८
...........................................................................................
एकूण १०८३११८ १८९४९२
‘लाॅकडाऊन’च्या कालावधीत प्राधान्य गट व अंत्योदय अन्न योजनेंतर्गत शिधापत्रिकाधारक लाभार्थ्यांना मोफत धान्याचे वाटप सुरू करण्यासंदर्भात शासनाचा आदेश प्राप्त झाला आहे. त्यानुसार, जिल्ह्यातील गरीब शिधापत्रिकाधारक लाभार्थ्यांना गुरुवारपासून मोफत धान्याचे वाटप सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
- बी.यू. काळे
जिल्हा पुरवठा अधिकारी