अकोला: शहरातून नागपूरकडे एका ट्रकमध्ये जाणारा प्रतिबंधित गुटखा पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांच्या विशेष पथकाने छापा घालून जप्त केला. ही कारवाई शुक्रवारी दुपारी नेहरू पार्क चौकाजवळील रादेगो महिला महाविद्यालयाजवळ करण्यात आली. जप्त करण्यात आलेल्या गुटख्याची किंमत अंदाजे १२ लाख रुपये आहे.के.ए. १६ सी-१७८0 क्रमांकाच्या ट्रकमध्ये भरून खामगावकडून नागपूरकडे प्रतिबंधित गुटखा जात असल्याची माहिती पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांच्या विशेष पथकाला मिळाली. विशेष पथकाने नेहरू पार्क चौकात सापळा रचून हा ट्रक पकडला. ट्रकची तपासणी केली असता, त्यामध्ये प्रतिबंधित गुटख्याचे तब्बल शंभर पोते आढळून आले. अन्न व औषधी प्रशासनाच्या अधिकाऱ्यांसमक्ष प्रतिबंधित गुटख्याची पाहणी केली असता, हा गुटखा १२ लाख रुपये किमतीचा असल्याचे समोर आले. पोलिसांनी ट्रकचालक व क्लिनर या दोघांना ताब्यात घेतले आहेत. २0 लाख रुपये किमतीचा ट्रक व गुटखा असा एकूण ३२ लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. जप्त केलेला प्रतिबंधित गुटखा पोलिसांनी अन्न व औषधी प्रशासनाच्या स्वाधीन केला आहे. ही कारवाई विशेष पथकाचे प्रमुख नितीन चव्हाण, अन्न व औषध प्रशासन अधिकारी गोरे, पोलीस कर्मचारी सुनील राऊत, शक्ती कांबळे, मनोज नागमते यांनी केली. (प्रतिनिधी)