दिग्रस बु. : पातूर तालुक्यातील सस्ती येथील वीज उपकेंद्रांतर्गत येत असलेल्या सस्ती येथील वीज तारा तुटल्याने परिसरातील दहा ते बारा गावांचा वीज पुरवठा खंडित झाला होता. रविवार सकाळी ६ वाजतापासून ते सायंकाळी ७ वाजतापर्यंत बत्ती गुल असल्याने नागरिक त्रस्त झाले होते. दरम्यान, तब्बल १३ तासानंतर वीज पुरवठा सुरळीत करण्यात आला.
ऐन उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये वीजपुरवठा खंडित झाल्याने ग्रामस्थांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले आहे. अनेकांच्या घरात पाण्याची सुविधा उपलब्ध झाली नाही. तसेच गावातील व्यवसाय वीज पुरवठ्याअभावी दिवसभर ठप्प होते. यामुळे सर्व व्यावसायिकांचे आर्थिक नुकसान झाले आहे. दरम्यान वीज पुरवठा बंद असल्याने गुरांच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला होता. दर आठ दिवसांतून असे प्रकार घडत असल्याने वीज ग्राहक वैतागले आहेत. परिसरातील दिग्रस बु., दिग्रस खुर्द, तुलंगा बु., तुलंगा खुर्द, संगोळा, लावखेड, सस्ती, निमखेड, बाभूळगाव आदी गावांतील ग्रामस्थांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागले.
-----------------------------
माझा दुग्धव्यवसाय असून, रविवारी दिवसभर वीज पुरवठा खंडित असल्याने गुरांच्या पाण्याची व्यवस्था करताना कसरत झाली. दर आठ दिवसातून असे प्रकार घडत असल्याने महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन वीज पुरवठा सुरळीत करावा.
-शशिकांत ताले, दुग्ध व्यवसायिक, दिग्रस बु.