- संतोष येलकर
अकोला: सार्वजनिक वितरण व्यवस्था अंतर्गत शिधापत्रिकाधारक लाभार्थींना दरमहा रास्त भावाने धान्य वितरित करण्यासाठी दरमहा २५ तारखेपर्यंत रास्तभाव दुकानांमध्ये धान्याचा पुरवठा होणे आवश्यक असताना, जिल्ह्यातील १ हजार ६० रास्तभाव दुकानांपैकी ३ जूनपर्यंत ९४० रास्तभाव दुकानांमध्ये धान्याचा पुरवठा करण्यात आला असून, उर्वरित १२० रास्तभाव दुकानांमध्ये अद्याप धान्य पोहोचले नाही. त्यामुळे रास्तभाव दुकानांमार्फत शिधापत्रिकाधारक लाभार्थींना धान्याचे वितरण रखडले असून, धान्याचा लाभ केव्हा मिळणार, याबाबत शिधापत्रिकाधारक लाभार्थींकडून प्रतीक्षा केली जात आहे.सार्वजनिक वितरण व्यवस्था अंतर्गत जिल्ह्यातील राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंर्गत प्राधान्य गटातील शिधापत्रिकाधारक लाभार्थी, अंत्योदय योजनेंतर्गत शिधापत्रिकाधारक लाभार्थी आणि एपीएल केशरी शिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांना दरमहा गहू, तांदूळ, साखर, तूर डाळ, हरभरा डाळ इत्यादी धान्याचे वितरण करण्यात येते. त्यानुषंगाने जून महिन्यात जिल्ह्यातील शिधापत्रिकाधारकांना धान्य वितरित करण्यासाठी गहू व तांदुळाचा ८१ हजार २६० क्विंटल धान्यसाठा मंजूर करण्यात आला. जिल्ह्यातील १ हजार ६० रास्तभाव दुकानदारांनी धान्य पुरवठ्यासाठी धान्याच्या रकमेचा चालानद्वारे भरणाही केला. प्रत्येक महिन्यात २५ तारखेपर्यंत जिल्ह्यातील रास्तभाव दुकानांमध्ये धान्याचा पुरवठा करण्यात येतो; मात्र ३ जूनपर्यंत जिल्ह्यातील १ हजार ६० रास्तभाव दुकानांपैकी ९४० दुकानांमध्ये धान्याचा पुरवठा करण्यात आला असून, उर्वरित जिल्ह्यातील १२० रास्तभाव दुकानांमध्ये अद्याप धान्य पोहोचले नाही. त्यामुळे संबंधित रास्तभाव दुकानांद्वारे शिधापत्रिकाधारक लाभार्थींना रास्त भावाच्या धान्याचे वितरण सुरू करण्यात आले नाही. त्यानुषंगाने रास्त भावाच्या धान्याचा लाभ केव्हा मिळणार, याबाबत शिधापत्रिकाधारक लाभार्थींकडून प्रतीक्षा केली जात आहे.जिल्ह्यात असे आहेत शिधापत्रिकाधारक लाभार्थी!प्राधान्य गट : १०,५६,७१४अंत्योदय योजना : ४५,०५६एपीएल शेतकरी : २,५२,९३०असा मंजूर आहे धान्यसाठा!जिल्ह्यातील श्धिापत्रिकाधारक लाभार्थींसाठी जून महिन्यात ८१ हजार २६० क्विंटल धान्याचा साठा मंजूर करण्यात आला आहे. त्यामध्ये प्राधान्य गटातील शिधापत्रिकाधारकांसाठी गहू ३१ हजार ७१० क्विंटल व २१ हजार १३० क्विंटल तांदूळ, अंत्योदय योजनेंतर्गत शिधापत्रिकाधारकांसाठी गहू ६ हजार ७५० क्विंटल व तांदूळ ९ हजार २० क्विंटल आणि एपीएल शेतकरी शिधापत्रिकाधारकांसाठी गहू १० हजार १२० क्विंटल व तांदूळ २ हजार ५३० क्विंटल धान्य साठ्याचा समावेश आहे.धान्य पुरवठा केलेली अशी आहेत दुकाने!जिल्ह्यातील एकूण १ हजार ६० रास्तभाव दुकानांपैकी ३ जून पर्यंत ९४० रास्तभाव दुकानांना धान्याचा पुरवठा करण्यात आला. त्यामध्ये अकोला शहरातील ७६, अकोला ग्रामीण १३२, अकोट तालुक्यातील १४१, तेल्हारा तालुक्यातील ९९, बाळापूर तालुक्यातील ११४, पातूर तालुक्यातील ९४, मूर्तिजापूर तालुक्यातील १६३ व बार्शीटाकळी तालुक्यातील १२७ रास्तभाव दुकानांचा समावेश आहे. उर्वरित १२० रास्तभाव दुकानांना अद्याप धान्याचा पुरवठा करण्यात आला नाही.दरमहा २५ तारखेपर्यंत रास्तभाव दुकानांमध्ये धान्याचा पुरवठा होणे आवश्यक आहे; मात्र जिल्ह्यातील बहुतांश रास्तभाव दुकानांमध्ये ३ जूनपर्यंत धान्य पोहोचले नाही. धान्याचे वितरण सुरू झाले नसल्याने, शिधापत्रिकाधारक लाभार्थींमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे.-शत्रुघ्न मुंडेजिल्हाध्यक्ष, रास्तभाव दुकानदार संघटनाजिल्ह्यातील रास्तभाव दुकानांमध्ये करण्यात आलेल्या धान्य पुरवठ्याचा आढावा मंगळवारी घेण्यात येणार आहे. ज्या दुकानांमध्ये धान्य पोहोचले नाही, अशा रास्तभाव दुकानांना तातडीने धान्याचा पुरवठा करण्यात येईल तसेच रास्तभाव दुकानांद्वारे तातडीने शिधापत्रिकाधारक लाभार्थींना धान्याचे वितरण करण्यात येणार आहे.-गजानन सुरंजेउपजिल्हाधिकारी तथा प्रभारी जिल्हा पुरवठा अधिकारी