डाबकी रोड पोलिसांची कारवाई, अन्न व औषध प्रशासन विभाग झोपेत
अकोला : गुजरातमधील सुरत येथुन अकोल्यात एका खासगी बसने आणलेला १२०० किलो भेसळयुक्त खवा डाबकी रोड पोलिसांनी गुरुवारी जप्त केला. हा खवा आरोग्यास हानिकारक असल्याची माहिती आहे. याकडे अन्न व औषध प्रशासन विभागाची अर्थपूर्ण डोळेझाक असल्याचा आरोप करण्यात येत आहे.
हा बनावट खवा ‘मेड इन गुजरात’ असून, देशभरात तो पोहोचविला जात असल्याचे पोलिसांच्या कारवाईनंतर उघड झाले आहे. जप्त करण्यात आलेला हा खवा अन्न व औषध प्रशासनाच्या ताब्यात देण्यात आला आहे.
सण उत्सव पाहता मिठाईची आवक वाढणार असल्याचे पाहून अकोला शहरात गुजरातवरून भेसळयुक्त खवा जीजे ३३ टी ००९९ या खासगी बसने विक्रीसाठी आणण्यात येत असल्याची माहिती डाबकी रोड पोलीस स्टेशनचे ठाणेदार विजय नाफडे यांना मिळाली. या माहितीवरून त्यांनी सहायक पोलीस निरीक्षक मनोज लांडगे यांना कारवाई करण्याचे आदेश दिले. यावरून खासगी ट्रॅव्हल्सची तपासणी केली असता, यात १ लाख ९१ हजार ४०० रुपयांचा ८७० किलो भेसळयुक्त खवा व २ लाख रुपये किमतीचा कृष्णा मिठाईचा २७ किलोचा साठा असा एकूण ३ लाख ९१ हजार ४०० रुपयांचा भेसळयुक्त खवा जप्त करण्यात आला आहे. हा खवा अकोल्यातील वैभव मोडक, पोद्दार व भारती नामक व्यावसायिकांचा असल्याचे तपासात निष्पन्न झाल्याची माहिती आहे.
खवा नसून तुपातील पदार्थ
पोलिसांनी जप्त केलेला खवा नसून तुपातील एक वेगळा पदार्थ असल्याची माहिती आता अन्न व औषध प्रशासन विभागाचे अधिकारी देत आहेत. त्यांनी या पदार्थांचे नमुने घेतले असून तपासणीसाठी ते पाठविण्यात आले आहे. मात्र पोलिसांच्या कारवाईनंतर या भेसळयुक्त पदार्थांचे नेमके नाव काय, हेच समोर येत नसल्याने कारवाई अधांतरी असल्याची माहिती आहे.
अन्न व औषध प्रशासन विभागाचा कानाडोळा
अकोल्यात यापूर्वीदेखील रेल्वेने आणण्यात आलेला खवा जप्त करण्यात आलेला आहे. तसेच शहरात बेकरीमधील पदार्थांवर बुरशी चढण्याचे प्रकरण दोन दिवसापूर्वी घडलेले आहे. असे असतानाही भेसळयुक्त व बनावट खाद्यपदार्थांवर अद्यापही ठोस कारवाई अकोला अन्न व औषध प्रशासन विभागाने केली नसल्याचे वास्तव आहे.