अकोला: सातवा वेतन आयोग लागू करण्याच्या मागणीसाठी राज्यातील चारही कृषी विद्यापीठातील १२ हजार कर्मचारी सामूहिक रजेवर गेले. शासनाने मागणी मान्य न केल्यास ७ नोव्हेंबरपासून कर्मचारी बेमुदत काम बंद आंदोलन करणार असल्याची माहिती कृषी विद्यापीठ कर्मचारी समन्वय संघातर्फे देण्यात आली. सध्या या कर्मचाऱ्यांचे लेखणी बंद आंदोलन सुरू आहे. राज्यातील कृषी विद्यापीठातील कर्मचाऱ्यांना सुधारित आश्वासित प्रगती योजनेसह सातवा वेतन आयोग लागू करण्यात यावा, या प्रमुख मागण्यांसाठी मागील तीन दिवसांपासून राज्यातील चारही कृषी विद्यापीठातील कर्मचाऱ्यांचे राज्यव्यापी आंदोलन सुरू आहे. गत दोन दिवसांपासून कर्मचाऱ्यांनी लेखणी बंद आंदोलन सुरू केले आहे. दरम्यान, चारही विद्यापीठांच्या प्रतिनिधींनी बुधवार ४ नोव्हेंबर रोजी शरद पवार आणि राज्याचे कृषिमंत्री दादाजी भुसे व खासदार सुप्रिया सुळे यांची भेट घेतली. यावेळी शिष्टमंडळाने मागण्यांसंदर्भात चर्चा केली; मात्र या चर्चेतून कुठलीच स्पष्टता दिसून आली नसल्याने आंदोलन पुढे सुरू ठेवण्याचा निर्णय कर्मचारी समन्वय संघातर्फे घेण्यात आला. त्या अनुषंगाने शुक्रवार, ६ नोव्हेंबर रोजी राज्यातील चारही कृषी विद्यापीठातील जवळपास १२ हजार कर्मचारी सामूहिक रजा आंदोलनावर जाणार आहेत. त्या अनुषंगाने डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील शहीद स्तंभाजवळ सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास कर्मचारी एकत्र येणार असल्याचे कृषी विद्यापीठ कर्मचारी समन्वय संघातर्फे सांगण्यात आले.
७ नोव्हेंबरपासून बेमुदत काम बंद
सनाने मागण्या मान्य न केल्यास शनिवार, ७ नोव्हेंबरपासून बेमुदत काम बंदचा इशारा कृषी विद्यापीठ कर्मचारी समन्वय संघातर्फे देण्यात आला. आंदोलनामुळे गत तीन दिवसांपासून चारही कृषी विद्यापीठातील कामकाज ठप्प झाले आहे.