अकोला : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एस. टी. महामंडळाच्या बसेसना अँटिमायक्रोबियल केमिकल कोटिंग करण्यात येत आहे. या प्रक्रियेची अंमलबजावणी सुरू झाली असून, १२३ बसेसना अँटिमायक्रोबियल कोटिंग करण्यात आले आहे. त्यामुळे प्रवाशांना विषाणूंपासून सुरक्षा कवच मिळणार आहे. या बसेस कोरोना फ्री झाल्या असल्या, तरी प्रवासी मात्र बेफिकीर असल्यासारखे वागत आहेत.
अँटिमायक्रोबियल केमिकल कोटिंग प्रक्रिया बसेसमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात करणारी एस. टी. पहिली वाहतूक संस्था आहे. एस. टी. बसमध्ये अनेक ठिकाणी प्रवासी स्पर्श करतात, ज्यामुळे कोरोना व इतर विषाणूंच्या प्रसाराचा धोका असतो. तो टाळण्यासाठी एस. टी.ने बसेसना अँटिमायक्रोबियल केमिकल कोटिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यातील १२३ बसगाड्यांना हे मायक्रोबियल कोटिंग केले आहे. असे असले तरी बहुतांश प्रवासी विनामास्क व सॅनिटायझरचा वापर न करता प्रवास करत आहेत. त्यामुळे प्रवाशांची ही बेफिकिरी धोकादायक ठरू शकते.
१२७ बसेसना कोटिंग
एकूण बसेस कोटिंग झालेल्या बसेस
आगार क्र. १ - २६ ३०
आगार क्र. २ - ३० ३०
अकोट - ३५ २८
तेल्हारा - १९ २०
मूर्तिजापूर - १७ १५
एका एस. टी.ला वर्षातून सहावेळा होणार कोटिंग
एस. टी.ला अँटिमायक्रोबियल कोटिंग केल्यानंतर जवळपास २ महिने प्रवाशांना सुरक्षा मिळणार आहे. प्रत्येक २ महिन्याला कोटिंगचा खर्च ९ हजार ५०० रुपये आहे, तर एका एस. टी.ला वर्षातून सहावेळा कोटिंग केले जाईल. यापूर्वी थेट विमान कंपन्या या तंत्राचा उपयोग करत होत्या.
बाधित व्यक्ती उठून गेल्यानंतर धोका नाही, पण बाजूलाच बसला असल्यास?
एस. टी.ची प्रवासी वाहतूक सुरळीत सुरू झाली आहे; मात्र बहुतांश प्रवासी मास्क वापरत नाहीत. त्यामुळे धोका आणखी वाढला आहे.
अशात एस. टी. बसमध्ये एखादा कोरोना पॉझिटिव्ह असल्यास इतर प्रवाशांची चिंता वाढणार आहे.
प्रवासी म्हणतात...
एस. टी.मध्ये अँटिमायक्रोबियल केमिकल कोटिंग करण्यात आल्याने कोरोनाचा धोका कमी होणार आहे; मात्र प्रवासादरम्यान काही प्रवासी विनामास्क दिसून आले. प्रवासात नियम पाळणे आवश्यक आहे.
- किशोर पाटील
कोरोनाची रुग्णसंख्या कमी झाल्याने निर्बंध हटवल्यानंतर पुन्हा बसने प्रवास सुरू केला आहे; परंतु यावेळी प्रवासी सोशल डिस्टन्स पाळताना दिसून येत नाहीत. त्यामुळे धोका आणखी वाढू शकतो.
- गणेश देशमुख
विषाणू नष्ट करण्याची क्षमता
एस. टी.ला अँटिमायक्रोबियल कोटिंग करण्यात येत आहे. यामुळे प्रवाशांनी बसच्या गेटचे हँडल, सीटच्या पुढील हँडल आणि इतर भागाला हात लावला आणि त्यांच्या हातावर विषाणू असला, तरी कुठलाही विषाणू नष्ट करण्याची क्षमता या कोटिंगमध्ये राहणार आहे. यासाठी एजन्सी नियुक्त करण्यात आल्याची माहिती आहे.