लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : जिल्ह्यात लवकरच रब्बी हंगामातील पेरण्या सुरू होणार असून, त्यानुषंगाने जिल्हा कृषी विभागाने रब्बी पेरणीचे नियोजन केले आहे. त्यानुसार यंदा जिल्ह्यात १ लाख २३ हजार ६२० हेक्टर क्षेत्रावर रब्बी पीक पेरणी प्रस्तावित करण्यात आली आहे.पावसाळा संपला असून, रब्बी हंगामातील पेरण्या लवकरच जिल्ह्यात सुरू होणार असल्याने, शेतकऱ्यांनी रब्बी पेरणीची तयारी सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर यंदाच्या हंगामातील पेरणीचे नियोजन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे. यावर्षीच्या पावसाळ्यात जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला असून, धरणांमध्ये मुबलक जलसाठा उपलब्ध आहे.तसेच विहिरींच्या पाणी पातळीत लक्षणीय वाढ झाली असून, नदी-नाले वाहत आहेत. त्यामुळे यंदा जिल्ह्यात रब्बी हंगामातील पीक पेरणीच्या क्षेत्रात वाढ होण्याची शक्यता लक्षात घेता, कृषी विभागाचे जिल्ह्यातील रब्बी पीक पेरणीचे नियोजन केले आहे. त्यानुसार जिल्ह्यात यंदा १ लाख २३ हजार ६२० हेक्टर क्षेत्रावर रब्बी पिकांची पेरणी प्रस्तावित आहे. त्यामध्ये गहू, हरभरा, करडई, रब्बी ज्वारी, मका, सूर्यफूल, कांदा व इतर पिकांचा समावेश आहे. गतवर्षीच्या रब्बी हंगामात जिल्ह्यात १ लाख ७ हजार हेक्टर क्षेत्रावर रब्बी पिकांची पेरणी करण्यात आली होती. यावर्षी रब्बी पीक पेरणीचे प्रस्तावित क्षेत्र लक्षात घेता, यंदा जिल्ह्यात रब्बी हंगामातील पीक पेरणीच्या क्षेत्रात वाढ होण्याची शक्यता आहे.४१ हजार मेट्रिक टन खतसाठा मंजूर!रब्बी हंगामात जिल्ह्यातील पिकांसाठी ५७ हजार २०० मेट्रिक टन रासयनिक खत साठ्याची मागणी जिल्हा परिषद कृषी विभागामार्फत कृषी आयुक्तालयाकडे करण्यात आली होती.त्यापैकी ४१ हजार मेट्रिक टन रासायनिक खतासाठा कृषी आयुक्तालयाने मंजूर केला आहे. तसेच रब्बी पेरणीसाठी ६५ हजार २७६ क्विंटल बियाण्यांची मागणी आहे, अशी जिल्हा परिषद कृषी विभागाचे जिल्हा कृषी विकास अधिकारी डॉ. मुरली इगळे यांनी दिली.
अकोला जिल्ह्यात १.२३ लाख हेक्टर रब्बी पेरणी प्रस्तावित!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 09, 2020 10:50 AM