संतोष येलकर, अकोला: सार्वजनिक वितरण व्यवस्था अंतर्गत एपीएल शेतकरी रेशनकार्डधारक लाभार्थ्यांना धान्याऐवजी दरमहा १५० रुपये अनुदान देण्याचा निर्णय सात महिन्यांपूर्वी शासनाने घेतला. सात महिन्यांचा कालावधी उलटून गेला; मात्र १० ऑगस्टपर्यंत जिल्ह्यात केवळ २५ हजार ६३ एपीएल शेतकरी रेशनकार्डधारक लाभार्थ्यांच्या खात्यात ३७ लाख ५९ हजार ४५० रुपये अनुदानाची रक्कम जमा करण्यात आली असून, जिल्ह्यातील उर्वरित सुमारे १ लाख २५ हजार ३६४ एपीएल शेतकरी रेशनकार्डधारक लाभार्थ्यांच्या खात्यात अद्यापही दरमहा १५० रुपये अनुदानाची रक्कम जमा करण्यात आली नसल्याचे वास्तव आहे.
सार्वजनिक वितरण व्यवस्था अंतर्गत अंत्योदय अन्न योजना आणि प्राधान्य कुटुंबांतील रेशनकार्डधारक लाभार्थ्यांना दरमहा रास्तभाव धान्य दुकानांमधून मोफत धान्याचे वितरण करण्यात येत असून, एपीएल शेतकरी रेशनकार्डधारकांना गेल्या डिसेंबरपासून रास्तभाव धान्य दुकानांमधून धान्याचे वितरण बंद करण्यात आले आहे. एपीएल शेतकरी रेशनकार्डधारक लाभार्थ्यांना धान्याऐवजी दरमहा प्रत्येकी १५० रुपये अनुदान देण्याचा निर्णय गेल्या डिसेंबरमध्ये शासनामार्फत घेण्यात आला. त्यानुसार गेल्या जानेवारीपासून दरमहा शेतकरी लाभार्थ्यांच्या बॅंक खात्यात प्रत्येकी १५० रुपयांच्या अनुदानाची रक्कम जमा होणे अपेक्षित आहे. जिल्ह्यात एपीएल शेतकरी रेशनकार्डची संख्या ३८ हजार ५८९ असून, लाभार्थ्यांची संख्या १ लाख ५० हजार ४२७ आहे. त्यापैकी १० ऑगस्टपर्यंत जिल्हयातील केवळ २५ हजार ६३ शेतकरी रेशनकार्डधारक लाभार्थ्यांच्या खात्यात दरमहा १५० रुपये अनुदानापोटी ३७ लाख ५९ हजार ४५० रुपयांची रक्कम जमा करण्यात आली आली. जिल्ह्यातील उर्वरित १ लाख २५ हजार ३६४ एपीएल शेतकरी रेशनकार्डधारक लाभार्थ्यांच्या खात्यात मात्र अद्यापही प्रत्येकी दरमहा १५० रुपये अनुदानाची रक्कम जमा होणे बाकी असल्याचे चित्र आहे.
एपीएल शेतकरी रेशनकार्डधारक लाभार्थ्यांची अशी आहे संख्या!
तालुका लाभार्थी
- अकोला शहर ५१६३
- अकोला ग्रामीण २५४४४
- अकोट ४२९४४
- बाळापूर ७१५३
- बार्शिटाकळी ८१३२
- मूर्तिजापूर २७४४३
- पातूर ८०७०
- तेल्हारा २६०७८
अनुदानाची रक्कम खात्यात जमा झालेले असे आहेत लाभार्थी
जिल्ह्यात २५ हजार ६३ एपीएल शेतकरी रेशनकार्डधारक लाभार्थ्यांच्या खात्यात धान्याऐवजी प्रत्येकी दरमहा १५० रुपये प्रमाणे अनुदानाची रक्कम जमा करण्यात आली. त्यामध्ये अकोला शहर १२०८, अकोला ग्रामीण ३६९, अकोट ४४६६, बाळापूर १३२४, बार्शिटाकळी १२०२, मूर्तिजापूर १३९२, पातूर २६११ आणि तेल्हारा तालुक्यातील १२४९१ लाभार्थ्यांच्या खात्यात अनुदानाची रक्कम जमा करण्यात आली आहे.