अकोला: जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत यावर्षी जिल्ह्यातील १२५ गावांची निवड करण्यात येणार आहे. त्यासाठी गावांच्या याद्या तातडीने सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी जी.श्रीकांत यांनी सोमवारी अधिकार्यांच्या बैठकीत दिले. जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत कामे करण्यासाठी यावर्षी जिल्ह्यात १२५ गावांची निवड करण्याचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी जिल्ह्यातील सातही तालुक्यातल्या गावांची निवड करण्याकरिता गावांच्या याद्या तालुकास्तरीय समित्यांमार्फत सोमवारपर्यंत जिल्हास्तरीय समितीकडे सादर करण्याच्या सूचना जिल्हाधिकार्यांनी दिल्या. जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत जिल्ह्यातील गतवर्षीच्या कामांचा आढावा यावेळी जिल्हाधिकार्यांनी घेतला. या बैठकीला उपजिल्हाधिकारी (रोहयो) उदय राजपूत, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र निकम, जिल्हा नियोजन अधिकारी ज्ञानेश्वर आंबेकर यांच्यासह सिंचन विभाग, जिल्हा परिषद लघुसिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता व संबंधित अधिकारी उपस्थित होते.
‘जलयुक्त शिवार’मध्ये यंदा १२५ गावे!
By admin | Published: January 12, 2016 1:51 AM