अकोला : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (एमपीएससी) विविध पदांसाठी रविवारी परीक्षा घेण्यात आली. अकोल्यातील आठ केंद्रांवर जिल्ह्यातील १ हजार २७१ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली असून, ९५६ विद्यार्थी परीक्षेला गैरहजर होते.महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत निरीक्षक, प्रमाणित शाळा व संस्था तसेच रचना व कार्यपद्धती अधिकारी आणि इतर गट-ब पदांसाठी चाळणी परीक्षा घेण्यात आली. अकोला शहरातील आठ केंद्रांवर सकाळी ११ ते दुपारी १२ या वेळेत ‘एमपीएससी’ची परीक्षा घेण्यात आली. जिल्ह्यातील २ हजार २२७ विद्यार्थी या परीक्षेला प्रविष्ट होते. त्यापैकी १ हजार २७१ विद्यार्थ्यांनी ‘एमपीएससी’ची परीक्षा दिली असून, उर्वरित ९५६ विद्यार्थी परीक्षेला गैरहजर होते. परीक्षेच्या कालावधीत परीक्षा केंद्र परिसरात पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. परीक्षा नियंत्रक म्हणून निवासी उपजिल्हाधिकारी राजेश खवले, समन्वय अधिकारी म्हणून जिल्हा खनिकर्म अधिकारी डॉ. अतुल दोड व तहसीलदार विजय लोखंडे यांनी परीक्षा केंद्रांना भेटी देऊन पाहणी केली.