अकोला : शेतकरी आत्महत्या प्रकरणात तातडीने मदत देण्यासंदर्भात शनिवारी झालेल्या जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीत शेतकरी आत्महत्यांची १३ प्रकरणे मदतीसाठी पात्र ठरविण्यात आली असून, तीन प्रकरणे मदतीसाठी अपात्र ठरविण्यात आली, तर एका प्रकरणात फेरचौकशी करण्याचे निर्देश देण्यात आले.जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीत जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्यांच्या १७ प्रकरणांवर चर्चा करण्यात आली. त्यापैकी अकोला तालुक्यातील घुसर येथील श्रीकृष्ण रामभाऊ पागृत, बाळापूर तालुक्यातील सोनगिरी येथील भास्कर राजाराम गवई, मूर्तिजापूर तालुक्यातील मधापुरी येथील अनुप वसंतराव दहीकर, माना येथील नाजूक किसन राऊत, बार्शीटाकळी तालुक्यातील एरंडा येथील विठ्ठल मोतीराम गवळी, अकोला तालुक्यातील चिखलगाव येथील राजेश रामखिलवन यादव, गोत्रा येथील योगेश विष्णुदास वक्टे, माझोड येथील श्याम ऊर्फ अजय महादेव ठाकरे, बार्शीटाकळी तालुक्यातील हातोला येथील भानुदास ओंकार शिंदे, तेल्हारा तालुक्यातील पाथर्डी येथील वासुदेव धोंडूजी मामनकार, रायखेड येथील नथ्थू महादेव मोडोकार, सिरसोली येथील गणेश नथ्थुजी नेरकर व बार्शीटाकळी तालुक्यातील शिंदखेड येथील महादेव देवीदास कोगदे इत्यादी शेतकरी आत्महत्यांची १३ प्रकरणे मदतीसाठी पात्र ठरविण्यात आली. तीन प्रकरणे मदतीसाठी अपात्र ठरविण्यात आली असून, एक शेतकरी आत्महत्या प्रकरणात फेरचौकशी करण्याचे निर्देश देण्यात आले. जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कैलास पगारे, निवासी उपजिल्हाधिकारी राजेश खवले, जिल्हा उपनिबंधक गोपाळ मावळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र निकम, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक आलोक तराणिया व संबंधित अधिकारी उपस्थित होते.