अकोला: लग्न कार्यासाठी एसटी बसद्वारे छत्रपती संभाजीनगर येथे जाण्यासाठी निघालेले सतीश बापूराव गंगाळे यांना मदत करण्याच्या बहाण्याने त्यांच्या बॅगमधून १३ लाख रुपयांचे सोने व नगद रक्कम लंपास केल्याची घटना शनिवारी कमला वाशिम बायपास चाैकात घडली. मदत करणारे चोरटे एसटी बसमधून कमला वाशिम बायपास चौकात उतरल्यामुळे फिर्यादी गंगाळे यांना संशय आला अन् त्यांच्या बॅग मधील सोने लंपास झाल्याचे उघडकीस आले. याप्रकरणी सिव्हील लाइन पोलीस ठाण्यात अज्ञात पाच ते सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मोठी उमरीस्थित गणेश नगर येथील रहिवासी सतीश बाबुराव गंगाळे (६०) हे त्यांच्या पत्नीसह लग्नकार्यासाठी छत्रपती संभाजीनगर येथे जाण्यासाठी मध्यवर्ती बस स्थानकावर आले. यावेळी त्यांनी मुर्तीजापुर ते शिर्डी या बसमध्ये प्रवेश केला. त्यांच्या मागोमाग पाच ते सहा अज्ञात इसम एसटी बसमध्ये शिरले. त्यांनी मदत करण्याचा बहाण्याने गंगाळ यांच्या हातातील बॅग स्वतःजवळ ठेवून घेतली. दरम्यान, ही एसटी कमला वाशिम बायपास चौकात आल्यानंतर संबंधित इसमांनी एसटी बस थांबवून आम्हाला वाशीमकडे जायचे असल्याचे सांगत बसमधून घाइघाइत खाली उतरले. तेव्हा फिर्यादी सतीश गंगाळे यांना संशय आल्याने त्यांनी बॅगची तपासणी असतात त्यातून सोने व नगदी रक्कम लंपास झाल्याचे समाेर आले. ही बाब त्यांनी एसटी वाहकाला सांगितल्यानंतर चालकाने घटनेचे गांभीर्य ओळखून तातडीने एसटी बस सिव्हील लाईन पोलीस स्टेशनच्या आवारात उभी केली. घटनेची गांभीर्य ओळखून स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी कमला वाशिम बायपास चौक परिसरात चौकशी केली. दरम्यान, फिर्यादी सतीश गंगाळे यांच्या तक्रारीवरून सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यात अज्ञात पाच ते सहा इसमांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी म्हणतात साेन्याची किंमत जास्तफिर्यादी सतीष गंगाळे यांच्या दाव्यानुसार त्यांच्याकडे सुमारे ३३ लाख रुपये किंमतीपेक्षा अधिक रकमेचे साेने हाेते. याव्यतिरिक्त नगद पैसे हाेते. दरम्यान, मध्यवर्ती बस स्थानकावर प्रवाशांचे पैसे, साेने लांबविणारी टाेळी सक्रिय असून यातील काही परजिल्ह्यातील चाेरट्यांचा समावेश असून त्यांना शहराच्या मध्यवर्ती भागातील स्थानिक चाेरटे मदत करीत असल्याचे बाेलल्या जाते. या टाेळ्यांमध्ये महिलांचा देखील समाेवश आहे. बस स्थानकाच्या आवारात हात साफ केल्यानंतर खासगी बसद्वारे टाेळीतील सदस्य पसार हाेत असल्याची माहिती आहे.