लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: घोड्यापासून मानवाला संसर्ग होणाऱ्या ग्लँडर्स रोगाच्या संशयावरून पुणे येथे पाठविण्यात आलेले १३ नमुने तपासणीमध्ये निगेटिव्ह आहेत. त्याचवेळी लगतच्या मध्यप्रदेशात रोगाचा प्रादुर्भाव वाढत असून, खबरदारीच्या उपाययोजना करण्यासाठी अमरावती प्रादेशिक पशुसंवर्धन सहआयुक्त डॉ. पी.एस. चव्हाण यांनी गुरुवारी पंचायत समितीमध्ये बैठक घेतली. आतापर्यंत जिल्ह्यातील घोड्यांचे ९१ रक्तजल नमुने गोळा करून पुणे येथील रोग अन्वेषण प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत.घोड्याला लागण होणाऱ्या ग्लँडर्सचा फटका मानवालाही बसतो. या रोगावर कोणतेच औषध उपलब्ध नसल्याची माहिती आहे. त्यामुळे या रोगाची लागण झालेल्या घोड्यांची तपासणी करून मानवी आरोग्यासाठी प्रतिबंधक उपाययोजना करणे, एवढेच हातात आहे. त्यासाठी घोड्यांचे रक्तजल नमुने गोळा करून त्याची तपासणी रोग अन्वेषण प्रयोगशाळेत करण्याची मोहीम युद्धपातळीवर सुरू आहे. अकोला पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालयांतर्गत पहिल्या टप्प्यातील मोहीम जवळपास आटोपली आहे. त्यामध्ये ५ ते १० किमीच्या परिघातील सर्व घोड्यांची पाहणी करणे, त्यांचे रक्तजल नमुने घेणे, तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविणे सुरू आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ९१ रक्तजल नमुने गोळा करण्यात आले आहेत. पुणे येथील प्रयोगशाळेत त्याची तपासणी झाल्यानंतर पुढील तपासणीसाठी हरियाणा राज्यातील हिस्सार येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात येतात. तेथे नमुने पॉझिटिव्ह आल्यास तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जातात. जिल्ह्यातील तीन घोड्यांचा संशयास्पद मृत्यूगेल्या वर्षी आॅक्टोबर, नोव्हेंबर महिन्यात पशुसंवर्धन विभागाने नमुने गोळा केले होते. त्यामध्ये अकोला तालुक्यातील दोन आणि मूर्तिजापूर तालुक्यातील तीन घोड्यांचे तपासणी अहवाल पॉझिटिव्ह होते. त्यामुळे पशुसंवर्धन विभाग पुरता धास्तावला. २२ मे पूर्वी जिल्ह्यातून गोळा केलेले १३ नमुने निगेटिव्ह असल्याचा अहवाल गुरुवारी ८ जून रोजी पशुसंवर्धन विभागाला मिळाला आहे. त्यातच अकोल्यातील दोन आणि मूर्तिजापुरातील एका घोड्याचा मृत्यू झाल्याने धास्ती आणखीच वाढली; मात्र त्यांचा मृत्यू ग्लँडर्स रोगाने झाला नसल्याचे अनुमान मालकांनी वर्णन केलेल्या लक्षणावरून काढण्यात आले आहे. मूर्तिजापुरातील दोन घोडे सध्या पशुसंवर्धन विभागाच्या निरीक्षणात आहेत. त्यांचे रक्तजल नमुने पुनर्तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. दुसऱ्या टप्प्यात १० ते २० किमीची तपासणीग्लँडर्सचा प्रादुर्भाव ओळखणे आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी पशुसंवर्धन विभागाची दुसऱ्या टप्प्यातील मोहीम लवकरच सुरू होत आहे. त्यामध्ये १० ते २० किमीच्या परिघातील घोड्यांची पाहणी केली जाणार आहे. त्यासाठी अकोला पंचायत समितीमध्ये बैठक घेण्यात आली. यावेळी डॉ. चव्हाण यांच्यासह अकोल्याचे उपायुक्त डॉ. व्ही.बी. भोजणे, प्रवीण राठोड, सहायक आयुक्त डॉ. संजय पारडे, डॉ. नम्रता बाभुळकर, डॉ. डी.जी. पाटील उपस्थित होते.
घोड्याच्या ग्लँडर्सचे १३ नमुने निगेटिव्ह
By admin | Published: June 09, 2017 3:48 AM