लोकमत न्यूज नेटवर्कसायखेड : बार्शीटाकळी तालुक्यात एक विभागीय कार्यालय व चार विद्युत उपकेंद्र (वितरण) असून, येथील तालुका पातळीवरील उपकेंद्र अनेक समस्यांनी हेरले आहे. तालुक्याला अकोला एमआयडीसी येथून २५ कि.मी. अंतरावरून वितरण करण्यात येते. धाबा, महान, पिंजर या ३३ केव्ही फिडरचे अंतर २० कि.मी. आहे. असे तालुक्याचे एकूण ४५ कि.मी. च्या जवळपास अंतर येते. या फिडरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यास पूर्ण तालुक्याचा पुरवठा रात्रंदिवस खंडित होतो. ही समस्या दूर करण्यासाठी इतर तालुक्याप्रमाणे बार्शीटाकळी तालुक्यात पिंपळखुटा परिसरात १३२ केव्ही केंद्र उभारण्यात यावे, अशी मागणी काँग्रेस कमिटीचे तालुका महासचिव भारत बोबडे यांनी अकोला येथे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या जनतेशी थेट संवाद कार्यक्रमात लेखी निवेदन देऊन केली.यासह बार्शीटाकळीच्या उपकेंद्रात कनिष्ठ अभियंता पद रिक्त आहे. त्यामुळे घरगुती, वाणिज्य व कृषिपंप ग्राहकांचे शेकडो नवीन मीटर कनेक्शनचे अर्ज व तक्रारी प्रलंबित आहेत. येथे ११ तंत्रज्ञ पदे मंजूर असून, फक्त ६ तंत्रज्ञ कार्यरत आहेत. ही पदे वाढवून द्यावे आदींसह महत्त्वाच्या मागण्यांचे निवेदन यावेळी बोबडे यांनी ऊर्जामंत्री यांना जनतेच्यावतीने दिले. ‘लोकमत’ वृत्ताची दखल‘वीज चोरीचा भुर्दंड सामान्य ग्राहकांना’ अशा आशयाचे वृत्त १९ मे रोजी ‘लोकमत’ने प्रकाशित केले होते. घरगुती वीज ग्राहकांना त्यामुळे फॉल्टी, आरएनएच्या नावाखाली अव्वाच्या सव्वा वीज बिल देण्यात येते. त्याची दुरुस्तीसुद्धा करून दिली जात नाही. त्यामुळे गरीब ग्राहकांना विनाकारण येणारे बिल भरावे लागते. अन्यथा मीटर काढून नेण्याची कारवाई होते. हा मुद्दा भारत बोबडे यांनी लेखी स्वरूपात ऊर्जामंत्र्यांसमोर उपस्थित केला. तेव्हा संबंधित महावितरणच्या यंत्रणेकडून याची दखल घेण्यात येणार असल्याचे आश्वासन ऊर्जामंत्र्यांनी दिले. तसेच बार्शीटाकळी येथे १३२ के.व्ही. उपकेंद्राच्या निर्मितीसाठी तांत्रिक माहितीकरिता व उपकेंद्राचे काम सुरू करण्याच्या मान्यतेपूर्वी मुंबई येथे संबंधित बैठक बोलाविण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
बार्शीटाकळीत १३२ के.व्ही. उपकेंद्राची निर्मिती व्हावी!
By admin | Published: May 20, 2017 1:52 AM