महापालिका क्षेत्रात काेराेनाचा वाढता प्रादुर्भाव चिंतेची बाब ठरत आहे. दुकाने खुली करण्यासाठी परवानगी हवी असेल, तर जिल्हा प्रशासनाने काेराेना चाचणी बंधनकारक केली. त्यामुळे शहरातील व्यापारी, दुकानांमधील कामगारांनी चाचणीसाठी पुढाकार घेतला. या दरम्यान, काेराेना सदृश्य लक्षणे आढळून येणाऱ्यांचीही संख्या वाढली आहे. त्यामुळे महापालिकेच्या चाचणी केंद्रांवर नागरिकांनी गर्दी केल्याचे दिसत आहे. शहरात काेराेना बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ हाेत असली, तरीही अकाेलेकरांना गांभीर्य नसल्याचे दिसत आहे. बाजारपेठेत, दुकानांमध्ये साहित्य खरेदीसाठी जाणाऱ्या नागरिकांकडून नियम पायदळी तुडविल्या जात आहेत. यामुळे मनपा प्रशासनाच्या चिंतेत वाढ झाली असून, वैद्यकीय आराेग्य यंत्रणेवर ताण वाढला आहे.
हाॅटस्पाॅट ठरणाऱ्या झाेनकडे दुर्लक्ष
शहरात काेराेना बाधित रुग्णांची सर्वाधिक संख्या पूर्व, दक्षिण झाेन पाठाेपाठ आता पश्चिम झाेनमध्ये वाढली आहे. आजपर्यंत काेराेनाचे सर्वाधिक बाधित रुग्ण पूर्व व दक्षिण झाेनमध्ये आढळून येत हाेते. त्यात जुने शहराची भर पडली आहे. या तीनही झाेनकडे मनपाचे दुर्लक्ष हाेत असल्याचे दिसून येत आहे. साेमवारी पूर्व झोनमध्ये काेराेनाचे ६५ रुग्ण आढळून आले, तसेच पश्चिम झोनमध्ये १५, उत्तर झोनमध्ये २७ व दक्षिण झोनमध्ये २९ असे एकूण १३६ रुग्ण आढळून आले आहेत.
१३६९ जणांनी केली चाचणी
शहरात काेराेनाचा माेठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला आहे. घराेघरी काेराेनाचे रुग्ण आढळून येत आहेत. मनपाने शहरात झाेननिहाय चाचणी केंद्र सुरू केले असता, साेमवारी १,३६९ जणांनी चाचणी केल्याचे समाेर आले. यामध्ये ३४० नागरिकांनी आरटीपीसीआर चाचणी केली, तसेच १,०२९ जणांनी रॅपिड अँटिजन चाचणी केली. संबंधितांचे अहवाल पुढील तपासणीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयाकडे पाठविण्यात आले आहेत.