शहरात कोरोना संक्रमणाचा उद्रेक वाढत असल्याने नगर परिषद प्रशासनाने नागरिकांना तपासणीसाठी आवाहन केले होते. गत ४ मार्चपासून कोरोना चाचणी तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. या कालावधीत २ हजार ६१ लोकांनी कोरोना चाचणी करून घेतली. यात १३६ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. येथील जे. बी. हिंदी शाळेत आतापर्यंत मोठ्या प्रमाणात नागरिकांची तपासणी करण्यात आली. त्याचप्रमाणे इतरत्रही नागरिकांनी आपली तपासणी करून घेतली असल्याने पॉझिटिव्ह व्यक्तींची संख्या अधिक असून, यातील काहींना हेंडज तंत्रनिकेतन महाविद्यालयात क्वारंटाईन करण्यात आले आहे. सद्य:स्थितीत १७५ रुग्ण ॲक्टिव्ह असल्याची माहिती नगर परिषदेचे मुख्याधिकारी विजय लोहकरे यांनी केली.
अशी झाली तपासणी
४ मार्च - १५३ जणांची तपासणी करण्यात आली. त्यात १८ पॉझिटिव्ह. ५ मार्च - ३१३ तपासणी, २४ पॉझिटिव्ह, ६ मार्च - ४४८ तपासणी, ९ पॉझिटिव्ह, ७ मार्च - ३२१ तपासणी, ४३ पॉझिटिव्ह, ८ मार्च - ४३३ तपासणी, १८ पॉझिटिव्ह, ९ मार्च - २४० तपासणी, १८ पॉझिटिव्ह, १० मार्च - १५३ तपासणी, ६ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने आतापर्यंतच्या शिबिर तपासणीत एकूण १३६ जण पॉझिटिव्ह आले आहेत.
अन्यथा दुकाने सील करणार
येथील व्यापारी, उद्योजक, दुकानदार, व्यावसायिक, नागरिकांना वारंवार सूचना व समज देऊनही त्यांनी कोरोना चाचणी केली नसेल तर त्यांची दुकाने, प्रतिष्ठाने सील करण्याची कारवाई १२ मार्चपासून करण्यात येणार असल्याचे मुख्याधिकारी विजय लोहकरे यांनी सांगितले.
कोरोना तपासणी विशेष शिबिर आज
शासन निर्देशानुसार मूर्तिजापूर शहरात जे. बी. हिंदी हायस्कूल येथे १२ मार्च रोजी १० ते ३ वाजेपर्यंत कोरोना तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
शहरातील सर्व नागरिक, दुकानदार, व्यापाऱ्यांनी तपासणी करून घेण्याचे आवाहन उपविभागीय अधिकारी अभयसिंह मोहिते व मुख्याधिकारी विजय लोहकरे यांनी केले आहे.