अवैध दारू विक्री: १७४ आरोपींवर पोलिसांकडून कारवाई
अकोला: पोलीस महासंचालकांच्या आदेशानुसार अकोला जिल्ह्यामध्ये अवैध दारू निर्मिती व विक्री करणाऱ्याविरुद्ध पोलिसांनी दुसऱ्या टप्प्यामध्ये २0 ते ३0 एप्रिलदरम्यान क्रॅक डाउन आॅपरेशन राबविण्यात आले. आॅपरेशनदरम्यान पोलिसांनी १ लाख ५८ हजार गावठी व देशी दारू आणि १३ लाख २४ हजार रुपये किमतीची विदेशी दारू जप्त करून एकूण १७४ आरोपींविरुद्ध कारवाई केली. सर्वोच्च न्यायालयाने राज्य व राष्ट्रीय महामार्गांवरील दारूची दुकाने हटविण्याचे आदेश दिल्यानंतर जिल्ह्यात अनेक ठिकाणी अवैध दारू विक्रीला ऊत आला आहे. अवैध दारू विक्रीविरुद्ध अकोला पोलिसांनी दुसऱ्या टप्प्यातसुद्धा २0 ते ३0 एप्रिलदरम्यान क्रॅक डाउन आॅपरेशन राबविले. पोलिसांनी ५६ ठिकाणी छापा घालून २,२१६ लीटर गावठी हातभट्टीची दारू व सडावा मोहा दारू जप्त केली. या दारूची किंमत १ लाख ५८ हजार रुपये आहे. पोलिसांनी याप्रकरणी ५६ आरोपींवर कारवाई केली. तसेच पोलिसांनी देशी, विदेशी दारू विक्री करणाऱ्या ११२ अड्ड्यांवर छापे घालून ३ हजार ७0 लीटर दारू जप्त करण्यात आली. पोलिसांनी ११८ आरोपींवर कारवाई केली. मोहिमेदरम्यान पोलिसांनी ७६ आरोपींविरुद्ध कलम ९३(ब) महाराष्ट्र प्रोव्हिबिशन कायद्याप्रमाणे कारवाई केली. पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाचे प्रमुख एपीआय हर्षराज अळसपुरे यांनी अकोट ग्रामीण येथील एका रेस्टॉरंटवर छापा घालून ४ लाख ५१ हजार रुपयांची विदेशी दारू जप्त केली. तसेच मूर्तिजापूर येथील मोनिका रेस्टॉरंटवर छापा घालून ४,४८९ देशी, विदेशी दारूच्या बाटल्या, चारचाकी, मोटारसायकल असा एकूण १४ लाख १९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक कैलास नागरे यांनी म्हैसांग येथे छापा घालून देशी दारू व मोटारसायकल जप्त करून २ लाख ५८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. जिल्ह्यात अवैध दारू विक्री किंवा अवैध दारूच्या हातभट्टीविरुद्ध नागरिकांनी पोलिसांकडे तक्रार करावी, असे आवाहन अतिरिक्त पोलीस अधीक्षक विजयकांत सागर यांनी केले आहे.