अकोला, दि. १५-गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या..च्या घोषणा देत बच्चे कंपनीसह तरुणांनी गणेश घाटावरील आसमंत दणाणून सोडल्याचे चित्र गणेश विसर्जनावेळी पाहावयास मिळाले. महाराणा प्रताप बागेमागील महापालिकेच्या गणेश घाटावर दरवर्षीप्रमाणे यंदादेखील गणेश विसर्जनाची चोख व्यवस्था करण्यात आली होती. रात्री उशिरापर्यंत घाटावर १४ हजार गणेश मूर्तींचे विसर्जन झाल्याची माहिती आहे.महापालिकेने महाराणा प्रताप बागेमागे मोर्णा नदीच्या काठावरील गणेश घाट सज्ज केला होता. या ठिकाणी सात कुंडांची दरवर्षीप्रमाणे यंदाही साफसफाई व रंगरंगोटी करण्यात आली होती. बच्चे कंपनी व सर्व वयोगटांतील गणेश भक्तांची वाढती संख्या लक्षात घेऊन मोर्णेच्या काठावर प्रखर विद्युत व्यवस्था उभारली होती. भाविकांनी गणेश मूर्तींचे विसर्जन केल्यानंतर त्या मूर्ती कुंडातून काढून त्यांचे कापशी तलावात पुन्हा विसर्जन करण्यासाठी मनपाच्या वतीने १३ टिप्परची व्यवस्था करण्यात आली. एका टिप्परच्या किमान सात ते आठ फेर्या मारण्यात आल्या.
गणेश घाटावर १४ हजार गणेश मूर्तींचे विसर्जन!
By admin | Published: September 16, 2016 3:13 AM