तेल्हारा (जि. अकोला), दि. २: येथील महादेवाच्या मंदिराजवळील गौतमा नदीपात्रात आपल्या मित्रांसोबत पोहण्यासाठी गेलेल्या ओम उमेश पांडव (१४) वर्षे रा. तेल्हारा या इयत्ता सातवीत शिकणार्या बालकाचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शुक्रवार २ सप्टेंबर रोजी दुपारी २ वाजताच्या सुमारास घडली. तेल्हारा येथील ओम उमेश पांडव हा आपल्या दोन सवंगड्यांसोबत शुक्रवार २ सप्टेंबर रोजी महादेव मंदिर संस्थानाजवळील नदीपात्रातील साचलेल्या पाण्यात पोहण्यासाठी गेला होता. तिघांपैकी ओम हा खोल पाण्यात गेल्याने बुडाला. नदीपात्रात गाळ असल्याने तो वर येऊ शकला नाही. त्यामुळे अन्य दोन मित्रांनी आरडाओरड केली. आरडाओरड ऐकून नजीकच्या शेतातील शेतमालक विजय बलोदे यांनी घटनास्थळी धाव घेऊन तत्काळ नागरिकांना माहिती दिली. गावातील समाजसेवी कार्यकर्त्यांनी व पट्टीच्या पोहणार्यांनी प्रयत्नांची शिकस्त करून ओम उमेश पांडव यास नदीपात्रातून बाहेर काढले. तेल्हारा पोलिसांच्या मदतीने त्यास तेल्हारा शासकीय ग्रामीण रुग्णालयात नेले असता डॉ. अनिल मल्ल यांनी मृत घोषित केले. या प्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. पंचनाम्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर शवविच्छेदनानंतर ओमचा मृतदेह कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आला. या घटनेने संपूर्ण शहर हळहळले. घटनेच्या वृत्ताने पांडव कुटुंबात एकच आक्रोश करण्यात आला. दरम्यान, माजी आमदार संजय गावंडे यांनी दवाखान्यात जाऊन पांडव कुटुंबीयाचे सांत्वन केले. तेल्हारा येथील वैकुंठधाम स्मशानभूमीत त्याच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले.
मित्रांसोबत पोहण्यासाठी गेलेल्या १४ वर्षीय ओमचा बुडून मृत्यू
By admin | Published: September 03, 2016 2:14 AM