अकोला, दि. 0३- शहरातील दिवेकर आखाडा परिसरातील रहिवासी असलेला तसेच गतिमंद मुलगा २00३ मध्ये म्हणजेच १४ वर्षांपूर्वी अचानक बेपत्ता झाला होता. या मुलाची माहिती केरळ येथील एका अधिकार्याने २५ दिवसापूर्वी खदान पोलिसांना दिल्यावर पोलिसांनी या माहितीचा मागोवा घेत सदर मुलाचा शोध लावून शुक्रवारी रात्री त्याला आईच्या स्वाधीन केले. सदर मुलगा हा गत १४ वर्षांपासून केरळमधील कालीकतमध्ये एका ह्यएनजीओह्णच्या बालसुधार गृहात राहत होता.दिवेकर आखाडा परिसरातील रहिवासी संचित पुंडलीक डांगे हा मुलगा काही प्रमाणात गतिमंद आहे. २00३ मध्ये तो १४ वर्षांचा असताना त्याचे वडील पुंडलीक सूर्यभान डांगे यांचे निधन झाले. आधीच गतिमंद असलेला संचित वडिलांच्या निधनाने खचला आणि अचानकच रेल्वे स्टेशनवर जाउन तो एका रेल्वेने थेट केरळमध्ये गेला. केरळमधील कोझीकोडे जिल्हय़ातील मारीकुन्नू तालुक्यातील ऐवाचुर या गावात तो विमनस्क अवस्थेत फिरत असताना तो ह्यआशाभवन वेलीमाडकुन्नूह्ण या सामाजिक संस्थेच्या पदाधिकार्यांना भेटला. या संस्थेच्या पदाधिकार्यांनी त्याला संस्थेच्याच आश्रमात ठेवून उपचार सुरू केले. विचारपूस करण्याचा प्रयत्न केला; मात्र भाषेची प्रचंड अडचण असल्याने आणि तो गतिमंद असल्याने बराच कालावधी निघून गेला. या कालावधीत संचित हा मल्याळम भाषा शिकला. त्यामुळे त्याने अकोला येथील रहिवासी असल्याचे सांगून सर्व माहिती संस्थेच्या पदाधिकार्यांना दिली; मात्र पदाधिकार्यांनाही अकोल्याविषयी माहिती नसल्याने त्यांनी केरळमधील आयबीचे अधिकारी शिवम यांच्याशी संपर्क केला. शिवम यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून खदानचे ठाणेदार गजानन शेळके यांच्याशी एक महिन्यापूर्वी संपर्क केला. यावरून शेळके यांनी सदर प्रकरणी खदानचे कर्मचारी जगदीश इंगळे यांना कामाला लावले. इंगळे यांनी मुलाच्या आईचा शोध घेऊन प्रकरणाला गती दिली. केरळमधील संबंधित संस्थेशी बोलणे करून दुर्गाबाई डांगे यांना केरळमध्ये रवाना केले. शुक्रवारी रात्री दुर्गाबाई या मुलाला घेऊन अकोल्यात परतताच त्यांनी खदान पोलीस स्टेशन गाठून ठाणेदार गजानन शेळके, जगदीश इंगळे आणि सिव्हिल लाइन्सचे उमेश आणि दिलीप उमाळे यांचे आभार मानले.या माय-लेकांची भेट घालून देण्यात खदान पोलिसांचे मोठे श्रेय आहे. यामध्ये जगदिश इंगळे या कर्मचार्यानेही दिवस-रात्र मेहनत घेऊन मुलाला आईच्या स्वाधीन करण्याचे मोठे काम केले. कोणतीही माहिती नसताना त्याच्या आईचा अकोल्यातून शोध घेऊन त्यांनी ही कामगिरी केली. दरम्यान केरळमधील संचित यास त्याच्या आईच्या स्वाधीन करण्यासाठी खदान पोलिसांनी अथक परिश्रम घेतले; मात्र केवळ बेपत्ता असल्याची नोंद सिव्हिल लाइन्स पोलीस स्टेशनमध्ये दाखल असल्याने सदर मुलगा अकोल्यात येण्यापूर्वीच श्रेय लाटण्यासाठी माध्यमांना अर्धवट माहिती देऊन प्रसिद्धी मिळविण्याचे काम सिव्हिल लाईन पोलसांनी केले. खदान पोलिसांनी दिवस-रात्र परिश्रम घेतले; मात्र मुलगा व आईची भेट झाल्यानंतरच माहिती माध्यमांना देण्याचे ठरवले; परंतु सिव्हिल लाइन्स पोलिसांनी मिसिंग दाखल असताना शोध घेण्याची तसदी घेतली नाही; परंतु माध्यमांना अर्धवट माहिती देऊन प्रसिद्धी मिळवून घेतली.
१४ वर्षांपूर्वी बेपत्ता झालेला युवक आईच्या स्वाधीन
By admin | Published: February 04, 2017 2:38 AM