अकोला: जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजनेंतर्गत जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या नवीन शाळा इमारतींचे बांधकाम आणि शाळा इमारतींच्या दुरुस्ती कामांसाठी १४ कोटी १९ लाख रुपयांचा निधी जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाला २७ मार्च रोजी प्राप्त झाला. त्यामुळे जिल्ह्यातील नवीन शाळा वर्गखोल्यांचे बांधकाम आणि शाळा दुरुस्तीच्या कामांचा मार्ग मोकळा झाला.
जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजनेंतर्गत २०२०-२१ या आर्थिक वर्षात जिल्ह्यात जिल्हा परिषद प्राथमिक शाळांच्या नवीन इमारतींची बांधकामे व शाळा इमारतींची विशेष दुरुस्ती तसेच माध्यमिक शाळा इमारतींच्या विशेष दुरुस्ती कामांसाठी निधी मंजूर करण्यात आला. त्या अनुषंगाने नवीन शाळा इमारतींची बांधकामे आणि शाळा दुरुस्तीच्या कामांसाठी निधी मागणीचा प्रस्ताव जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागामार्फत जिल्हा नियोजन अधिकारी कार्यालयाकडे सादर करण्यात आला होता. त्यानुसार जिल्हा परिषद शाळांच्या नवीन इमारत बांधकामांसाठी ९ कोटी ४ लाख रुपये, शाळा इमारतींच्या विशेष दुरुस्ती कामांसाठी ४ कोटी ६९ लाख रुपये व माध्यमिक शाळांच्या विशेष दुरुस्ती कामांसाठी ४६ लाख ९० हजार रुपये असा एकूण १४ कोटी १९ लाख ९० हजार रुपयांचा निधी जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाला प्राप्त झाला. उपलब्ध निधीतून जिल्ह्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळांच्या इमारतींची नवीन बांधकाम व विशेष दुरुस्तीची कामे करण्यात येणार आहेत.
शाळा इमारतींची अशी आहेत कामे !
जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजनेंतर्गत जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या ७५ शाळांच्या नवीन इमारत बांधकामांसाठी ९ कोटी ४ लाख रुपये, १२६ शाळा इमारतींच्या दुरुस्ती कामांसाठी ४ कोटी ६९ लाख रुपये आणि ८ माध्यमिक शाळा इमारतींच्या दुरुस्ती कामांसाठी ४६ लाख ९० हजार रुपयांचा निधी प्राप्त झाला. उपलब्ध निधीतून नवीन शाळा इमारतींची बांधकामे व दुरुस्तीची कामे करण्यात येणार आहेत.