अकोला : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी (८ मे) जिल्हाधिकारी कार्यालयात पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा पार पडला. या मेळाव्यात ४३६ उमेदवारांनी सहभाग घेतला, त्यापैकी १४२ जणांची प्राथमिक निवड, तर १०२ जणांना नियुक्तीपत्र देण्यात आले आहे अशी माहिती शैक्षणिक गुणवत्ता कक्षाचे गजानन महल्ले यांनी दिली.
जिल्हाधिकारी निमा अरोरा यांच्या संकल्पनेतून पार पडलेल्या या मेळाव्यात महिंद्रा ॲण्ड महिंद्रा लिमिटेड, चाकण, पुणे, तसेच ईसाफ को-ऑपरेटिव्ह सोसायटी अकोला, गुजरात अंबुजा एक्सपोर्ट, अकोला या कंपनी सहभागी झाल्या होत्या. या मेळाव्यात एकुण ४३६ उमेदवारांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून सहभाग नोंदविला. मुलाखतीद्वारे निवड प्रक्रिया होऊन त्यात महिंद्रा ॲण्ड महिंद्रा चाकण, पुणे या कंपनीने १०२, गुजरात अंबुजा एक्स्पोर्ट लि. अकोला यांनी सात, गुरुकृपा सुपर बाजार यांनी एकूण १०, अबसोल्यूट बार्बेक्यू यांनी २३ उमेदवाराची प्राथमिक निवड केली आहे. महिंद्रा ॲण्ड महिंद्रा चाकण, पुणे यांनी प्राथमिक निवड म्हणून १०२ उमेदवारांना नियुक्तीपत्र दिले. तसेच येथे रुजू होणाऱ्या उमेदवारांसाठी अकोला येथून नि:शुल्क बस उपलब्ध करून देण्याची कंपनीने तयारी दर्शविली आहे.
जिल्हाधिकऱ्यांच्या हस्ते दिली नियुक्तीपत्रे
याप्रसंगी जिल्हाधिकारी निमा अरोरा यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले. या मेळाव्यास निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र द.ल.ठाकरे, शैक्षणिक गुणवत्ता कक्षाचे जिल्हा समन्वयक गजानन महल्ले यांची प्रमुख उपस्थिती होती. रोजगार मेळावा यशस्वी होण्याकरिता नरेद्र काकड, संदीप म्हस्के, गोपाळ भाकरे, गौरव पाटील, मनोज वैद्य, आदिनाथ सानप, शेख आरीफ, लक्ष्मण पाफड, गणेश तडस, महादेव नखाते, उमेद अभियानचे निशिकांत पोफळी, ॠग्वेद एैनापुरे, अजय चव्हाण, गजानन हिवरकर, रोहित बारस्कर यांनी परिश्रम घेतले.