अकोला : शेतकरी आत्महत्या प्रकरणात तातडीने मदत देण्याबाबत सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय समितीच्या सभेत जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्यांची १५ प्रकरणे मदतीसाठी पात्र ठरविण्यात आली. एक प्रकरण मदतीसाठी अपात्र ठरविण्यात आले असून, दोन शेतकरी आत्महत्या प्रकरणांत फेरचाैकशी करण्याचे निर्देश देण्यात आले.
जिल्हास्तरीय समितीच्या सभेत जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्यांच्या १८ प्रकरणांवर चर्चा करण्यात आली. त्यापैकी १५ शेतकरी आत्महत्यांची प्रकरणे मदतीसाठी पात्र ठरविण्यात आली. त्यामध्ये अकोट तालुक्यात आसेगा बाजार येथील श्रेयस दिनेश धांडे, बोर्डी येथील गजानन जगदीश रोहणकार, बळेगाव येथील रमेश रामदास ठाेकळ, अकोला तालुक्यात निपाणा येथील जगन्नाथ त्र्यंबक राऊत, दहीहांडा येथील रामराव गोवर्धन गाडे, शिवापूर येथील दीपक जगदेव वानखडे, लोणाग्रा येथील गुणवंत किसन भटकर, दीपक देवीदास घाटोळे, म्हातोडी येथील गजानन ओंकार वानखडे, पळसो खुर्द येथील विकास वसंता ढोके, पातूर तालुक्यात सस्ती येथील संदीप हिरामन शेळके, तेल्हारा तालुक्यात निंभोरा येथील मनोहर ज्ञानदेव बोदडे, बेलखेड येथील अरुण किसन खुमकर, वाडी अदमपूर येथील राहुल दिनकर खारोडे व मूर्तिजापूर तालुक्यात जामठी येथील मुकिंदा प्रल्हाद इंगळे इत्यादी १५ शेतकरी आत्महत्यांची प्रकरणे शासकीय मदतीसाठी पात्र ठरविण्यात आले. शेतकरी आत्महत्येचे एक प्रकरण मदतीसाठी अपात्र ठरविण्यात आले असून, दोन शेतकरी आत्महत्या प्रकरणांत फेरचाैकशी करण्याचे निर्देश देण्यात आले. जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, जिल्हा अग्रणी बॅंकेचे व्यवस्थापक आलोक तारेणीया यांच्यासह समितीचे सदस्य व संबंधित अधिकारी उपस्थित होते.