अकोला : शहरातील विकास कामांसाठी राज्य शासनाने सढळ हाताने निधी देण्याचे धोरण कायम ठेवले असून, नागपूर येथील अधिवेशनादरम्यान अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघाचे आमदार रणधीर सावकर यांनी सुचविलेल्या कामांसाठी १५ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी १५ कोटींच्या निधीला हिरवी झेंडी दिली.राज्यात भाजपाची सत्तास्थापन झाल्यानंतर शहर विकासासाठी शासनाकडून मोठ्या प्रमाणात निधी प्राप्त झाला आहे. प्राप्त निधीतून प्रामुख्याने रस्ते, पथदिवे व पाणी पुरवठा योजनेची कामे निकाली काढण्याला प्राधान्य देण्यात आल्याचे दिसून येते. शहरातील प्रमुख रस्त्यांचे निर्माण करण्यासाठी आ. गोवर्धन शर्मा, आ. रणधीर सावरकर यांनी शासनामार्फत आजवर कोट्यवधींचा निधी खेचून आणला आहे. नागपूर येथील पावसाळी अधिवेशनादरम्यान अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघातील विकास कामांसाठी शासनाने दोन दिवसांपूर्वी २० कोटींचा निधी मंजूर केला. अकोला पूर्व मतदारसंघाचे आमदार रणधीर सावरकर यांनी सुचविलेल्या कामांसाठी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शुक्रवारी १५ कोटींच्या निधीला मंजुरी दिली. प्राप्त निधीतून रस्ते, पथदिवे, नाल्या, उद्यानांचे सौंदर्यीकरण, सभागृहांचे निर्माण के ले जाईल.निधीचा ओघ सुरू; दर्जाचे काय?शहरातील विविध कामांसाठी राज्य शासनाकडून निधीचा ओघ सुरू असल्याचे दिसून येते. आजवर कधी नव्हे एवढ्या मोठ्या प्रमाणात शहराला कोट्यवधींचा निधी प्राप्त होत असला, तरी विकास कामांच्या दर्जाबाबत कोणीही गंभीर नसल्याचे चित्र आहे. त्याचे परिणाम नुकतेच समोर आले असून, सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत तयार होणाऱ्या सिमेंट व डांबरी रस्त्यांचे पितळ पहिल्याच पावसात उघडे पडले आहेत. दर्जेदार विकास कामांसाठी खुद्द लोकप्रतिनिधींनीच आग्रही असण्याची अपेक्षा वर्तविली जात आहे.