खेट्री : पातुर तालुक्यातील खेट्री येथील बसस्थानकाजवळ गेल्या वीस ते पंचवीस वर्षांपासून झोपडपट्टी वसली आहे. या वस्तीतील ग्रामस्थ मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत. झोपडपट्टी भागात जाण्यासाठी गावातून एकमेव रस्ता आहे. परंतु सदर रस्त्यावर काही लोकांनी १५ फुटांचे अतिक्रमण केल्यामुळे रस्ता अरुंद झाल्याचा आरोप झोपडपट्टीतील ग्रामस्थांनी ग्रामपंचायत, तहसीलदार, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हाधिकारी, पालकमंत्री यांच्याकडे २९ डिसेंबर रोजी दिलेल्या निवेदनातून केला आहे. झोपडपट्टी भागात मजुरी करणारे व शेतकरी वर्ग राहतो. त्यामुळे रस्त्याने बैलगाडी व शेतमाल झोपडपट्टी भागात नेण्यासाठी अडथळा निर्माण होत आहे. रस्त्यावर केलेल्या अतिक्रमणामुळे रोज वादविवाद होतात. त्यामुळे झोपडपट्टी भागातील सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता नाकारता येत नाही. ग्रामस्थांनी अतिक्रमण करणाऱ्यांना अतिक्रमण काढण्याबाबत वारंवार सांगितले असता, महिला पुढे करून खोट्या गुन्ह्यांत अडकविण्याच्या धमक्या दिल्या जातात. त्यामुळे सदर अतिक्रमण आठ दिवसांच्या आत काढण्यात यावे; अन्यथा आमरण उपोषणाला बसण्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. निवेदनावर जहुर खान लाल खा, फयाज बेग इस्माईल बेग, शेख हुसेन, शेख यासीन, शेख नसीर, नुरखा, शेख आयाज, शेख लाल यांच्यासह बहुसंख्य ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
प्रतिक्रिया
रस्त्याच्या परिसरातील दोन जणांच्या जागेचा वाद न्यायालयात प्रलंबित आहे. न्यायालयाचा निकाल लागल्यानंतर सदर रस्त्याचे मोजमाप करून रस्त्यावर केलेले अतिक्रमण काढण्यात येईल.
- रेश्मा बी अब्दुल शमीम, सरपंच - खेट्री