अकोला : कोरोना संक्रमन काळात लॉकडाऊनमुळे ठप्प असलेली राज्य परिवहन मंडळाची (एसटी) प्रवासी वाहतुक सेवा दोन महिन्यांपूर्वी सुरु झाली असली तरी, खर्च आणि उत्पन्नाचा ताळमेळ बसत नसल्याची स्थिती अद्यापही कायमच आहे. सणासुदीच्या दिवसांमध्ये आर्थिक स्थितीत सुधारणा येत असतानाच दिवाळीनंतर प्रवासी संख्या घटल्याने अकोल्यातील दोन्ही आगारांना दररोज दीड ते दोन लाखांचा तोटा सहन करावा लागत असल्याचे वास्तव समोर आले आहे.लॉकडाऊनचे नियम शिथील झाल्यानंतर ऑक्टोबर महिन्यात एसटीची प्रवासी वाहतुक सुरु झाली. अकोला आगार क्र. १ व आगार क्र. २ या दोन्ही आगारांमधून जिल्ह्यांचे ठिकाण व तालुक्यांच्या ठिकाणी बससेवा सुरु करण्यात आली. सुरुवातीला प्रवाशांकडून प्रतीसाद मिळाला नाही, परंतु काही दिवसानंतर प्रवासी संख्येत हळूहळू वाढ होत गेली. सणासुदीच्या दिवसांत दोन्ही आगारांना चांगली कमाई झाली. दररोज सरासरी पाच ते सहा लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले. दिवाळीची धामधुम संपल्यानंतर प्रवाशांची संख्या रोडावल्याचा परिणाम दोन्ही आगारांच्या उत्पन्नावर पडला आहे. गत काही दिवसांपासून प्रवाशी भाड्यापोटी दररोज जेमतेम चार लाखांपर्यंतची कमाई होत आहे. दररोज दीड ते दोन लाखांचा तोटा सहन करावा लागत आहे.
बसच्या फेऱ्याही घटल्या
सणासुदीच्या दिवसांमध्ये दोन्ही आगारांमधून ५० बसेस धावत होत्या. प्रवासी संख्या घटल्याने बसच्या बसच्या फेऱ्याही घटल्या असून, आज रोजी दोन्ही आगारांमधून दररोज ३३ बसेस धावत आहेत.
ग्रामीण भागात बससेवा नाहीच
दोन्ही आगारांमधून जिल्ह्यातील तालुक्यांची ठिकाणे व इतर जिल्ह्यांच्या शहरांसाठी बससेवा सुरु आहे. तथापी, जिल्ह्यातील ग्रामीण भाग अजूनही बससेवेपासून वंचित आहे. त्यामुळे गावातील लोकांना नाईलाजाने खासगी प्रवासी वाहतुकीची कास धरावी लागत आहे.