मागील वर्षी, मार्च २०२० मध्ये कोरोनाच्या पहिल्या लाटेनंतरचा लॉकडाऊन तसेच इतर कारणांमुळे वीजमीटर उपलब्धता कमी होत गेली. त्यामुळे नवीन वीजजोडण्या देण्याचा वेग काहीसा मंदावला होता. त्यानंतर मात्र वीजमीटर पुरवठ्याला गती आली आहे. गेल्या मार्च महिन्यापासून सिंगल फेजचे १८ लाख तर थ्री फेजचे १ लाख ७० हजार नवीन वीजमीटरच्या पुरवठ्याचे कार्यादेश यापूर्वीच देण्यात आले आहेत. मार्च २०२१पासून पुरवठादारांकडून नवीन वीजमीटर उपलब्ध होण्यास सुरुवात झाली आहे. आतापर्यंत सिंगल फेजचे १५ लाख ६६ हजार. तर थ्री फेजचे १ लाख १० हजार नवीन मीटर मुख्यालयातून क्षेत्रीय कार्यालयांना पाठविण्यात आले आहेत.
प्रादेशिक कार्यालयनिहाय मीटर पुरवठा (कंसात थ्री फेज)
पुणे प्रादेशिक कार्यालय - सिंगल फेज ४ लाख ६२ हजार (३९,१०३), कोकण- सिंगल फेज ५ लाख ४५ हजार (३७,७८७), नागपूर- २ लाख ९५ हजार (२२,८६०) आणि औरंगाबाद प्रादेशिक कार्यालयास सिंगल फेजचे १ लाख ६४ हजार व थ्री फेजचे १०,२५० नवीन वीजमीटर पाठविण्यात आलेले आहेत.
वीज जोडण्यांना वेग
वीजमीटर उपलब्ध झाल्यानंतर महावितरणकडून नवीन वीजजोडण्या कार्यान्वित करण्यास मोठा वेग देण्यात आला आहे. वर्षभरात महावितरणकडून साधारणतः ८ ते ९ लाख नवीन वीजजोडण्या देण्यात येतात. मात्र, गेल्या मार्च ते जुलै २०२१च्या कालावधीत उच्चदाबाच्या ४३५ आणि लघुदाबाच्या ५ लाख १८ हजार १४२ नवीन वीजजोडण्या कार्यान्वित करण्याची कामगिरी महावितरणने केली आहे.