मूर्तिजापूर : येथील लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालयाच्या मालकीच्या दीडशे एकर जमिनीवर काही नागरिकांनी अतिक्रमण केले होते. त्यामुळे रुग्णालयाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडत होता. ‘लोकमत‘ने याबाबत सातत्याने वृत्त प्रकाशित केले. अखेर महसूल विभागाने ही जमिन ताब्यात घेत, गुरुवारी ९३ एकर जमीनचा लिलाव केला. यातून १५ लाख रुपयांचा महसूल मिळाला आहे.
मूर्तिजापूर येथील लक्ष्मीबाई देशमुख यांनी सन १९३५ मध्ये या रुग्णालय उभारले होते. हे रुग्णालयासाठी त्यांनी स्व:मालकीची ५७ हेक्टर ८४ आर क्षेत्र शेत जमीन दान देऊन येणाऱ्या मिळकतीतून काही वर्षे रुग्णालय चालविले. त्यानंतर १९५८ मध्ये हे रुग्णालय जमिनीसह शासनाला हस्तांतरित करून रुग्णालयाचे नाव लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा
रुग्णालय असे केले. या रुग्णालयाकडे असलेली दीडशे एकर करून शेत जमीन दरवर्षी जाहिरात प्रसिद्ध करून वार्षिक पीक मक्त्याने देण्यासाठी लिलाव करण्यात येत होता. परंतु, कक्ष अधिकारी सार्वजनिक आरोग्य विभाग मंत्रालय, मुंबई यांनी १२ फेब्रुवारी २०१४ ला संचालक, आरोग्य सेवा मुंबई यांना ही शेत जमीन सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अखत्यारितील असून, जमीन शासकीय असल्याचे पत्रात म्हटले. त्यामुळे उपजिल्हा रुग्णालयाची इमारत व निवासस्थाने ही २ हेक्टर ८७ आर जमीन वगळता, उर्वरित ४५ हेक्टर २५ आर ही शेत जमीन जिल्हाधिकाऱ्यांना हस्तांतरित करण्यात आली आहे. २०१४ मध्ये हस्तांतरण झालेल्या जमीनवर इतरत्र लोकांनी कब्जा केला आहे. ही जमीन त्या लोकांच्या कब्जातून काढून तिचा लिलाव करण्याचा आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी उपविभागीय अधिकारी अभयसिंह मोहिते यांना दिला. त्या संदर्भात उपविभागीय अधिकारी, तहसीलदार व उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षकांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमून लिलाव निश्चित करण्यात आला. या जमिनीचे विवरण, हस्तांतरण, वापर आदींबाबत जमिनीचा शेती प्रयोजनासाठी शर्ती व अटीनुसार जिल्हाधिकारी यांनी महाराष्ट्र जमीन महसूल संहितेच्या अंतर्गत सदर जमीन लिलावात काढल्याने, निधी अभावी रुग्णालयात सुविधांची होत असलेली वाणवा भरून काढण्यासाठी मदत होणार आहे.
फोटो : तीन
९३ एकर जमीन दिली एक वर्षाच्या वहितीसाठी
संपूर्ण जमिनीवर महसूल प्रशासनाने ताबा मिळविला असून, यातील सिरसो भाग १ व भाग २ मधील (३७.६४ हेक्टर ) ९३ एकर जमिनीचा २४ जूनला एक वर्षाच्या वहितीसाठी लिलाव करून १५ लाख रुपयांचा महसूल गोळा केला आहे. कुरणखेड, दताळा आणि सिरसो येथील उर्वरित जमीन लवकरच लिलावात निघणार आहे.
दीडशे एकर जमिनीवर काही लोकांना ताबा केला होता. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने गुरुवारी सिरसो येथील ९३ हेक्टर जमिनीचा लिलाव करण्यात आला. त्यामुळे १५ लाख महसूल गोळा होईल. सिरसो, दताळा, कुरणखेड येथील उर्वरित जमिनीचा सुद्धा लवकरच लिलाव करण्यात येईल.
-अभयसिंह मोहिते,
उपविभागीय अधिकारी मूर्तिजापूर