अकोला: कोरोनाबाधित रुग्णांवर उपचारासाठी अकोल्यातील डाॅ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ (पीकेव्ही) परिसरातील अधिग्रहित करण्यात आलेल्या दोन वसतिगृहांमध्ये सोमवारी १५० खाटांचे कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले.
गत महिनाभरापासून जिल्ह्यात कोरोना विषाणूचा संसर्ग वाढला असून, कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. त्याअनुषंगाने जिल्ह्यात कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग नियंत्रित करण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यात येत आहेत. त्यामध्ये कोरोनाबाधित रुग्णांवर औषधोपचार करण्यासाठी कोविड केअर सेेंटर सुरू करण्यात येत आहेत. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार डाॅ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ परिसरातील दोन वसतिगृह कोविड केअर सेंटरसाठी अधिग्रहित करण्यात आली असून, या वसतिगृहांमध्ये १५० खाटांचे कोविड केअर सेंटर १ मार्चपासून सुरू करण्यात आले, अशी माहिती अकोल्याचे उपविभागीय दंडाधिकारी डाॅ. नीलेश अपार यांनी दिली.