लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : जन्मत: आणि अपघाती नशिबी आलेल्या विदर्भातील दिव्यांगांना समाजात सन्मानाने उभे करण्याचे काम गत तीन वर्षांपासून अकोल्यातील अनेक सामाजिक कार्यकर्ते करीत आहेत. यंदाही विदर्भातील १५0 दिव्यांगांना जगण्याचे बळ देण्याचा प्रयत्न महावीर सेवा सदन आणि रोटरी क्लब ऑफ अकोला मिडटाउनच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. विदर्भाच्या कानाकोपर्यातून आलेल्या या दिव्यांगांना कृत्रिम-हात पाय देण्याच्या उपक्रमाचे सर्वत्र तोंडभरून कौतुक होत आहे.सलग तीन वर्षांपासून अकोल्यात हा प्रयोग सुरू असून, विदर्भातील दिव्यांग या शिबिराचा लाभ घेत आहेत. यंदाही हे शिबिर अकोल्यातील दगडीपुलाजवळच्या ओसवाल भवनात १७ ते २४ सप्टेंबर या कालावधीत घेण्यात आले. विदर्भातील चंद्रपूर, वर्धा,जळगाव, बल्लारशहा, वाशिम, बुलडाणा आणि अकोला जिल्ह्यातील जवळपास १५0 दिव्यांगांनी या शिबिराचा लाभ घेतला. दूर-दुरून येऊन दिव्यांगांनी येथून कृत्रिम हातपाय बसवून घेतले. यावेळी दिव्यांगांच्या चेहर्यावरील हास्य सामाजिक कार्यकर्त्यांना अधिक प्रेरणा देणारे ठरले. गेल्या तीन वर्षांपासून दिव्यांगांना जगण्याचे बळ देण्याच्या या उपक्रमात नवल जैन, प्रकाश लोढिया, गिरीष राठी, राहुल गोसर, राजेश बिलाला, श्याम ठाकूर, रश्मी शहा, राजेश अग्रवाल, दीपेश शहा, आनंद चांडक, राजू बजाज, वैभव शहा, प्रशांत झांबड, मनोज खंडेलवाल, समीर शहा, हेमंत कटारिया, सुनील जांगीड, राजेश पटवारी, विक्रम गोलेच्छा, प्रशांत मानधणे सातत्याने प्रयत्न करीत आहेत.
विष्णूला मिळाला पाय!बल्लारशहा येथील तीन वर्षीय विष्णू संतने एका रेल्वे अपघातात पाय गमाविला होता. आईशिवाय जगण्याचा कोणताही आधार नसलेल्या विष्णूला या शिबिरात कृत्रिम पाय दिला गेला. मोलमजुरी करून दिनचर्या चालविणार्या या मध्यमवर्गीय मायलेकांना कृत्रिम पायाने जगण्याचे बळ दिले आहे.
रोहितही चालत गेला..!तेल्हारा येथील सहाव्या वर्गातील रोहित गणेश काकडे या चिमुकल्याने बोन कॅन्सरने पाय गमाविला होता. उपचाराअंती तो आता चांगला झाला. मात्र, त्याच्या पायाला जुळेल, असे कृत्रिम पाय मिळाले नव्हते. मात्र, अकोल्याच्या या शिबिरात रोहितही गावाकडे सर्वसामान्य मुलासारखा चालत गेला.-