अकोला : सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत एपीएल शेतकरी लाभार्थींना धान्याऐवजी दर महिन्याला प्रत्येकी १५० रुपये देण्याचा निर्णय शासनामार्फत गेल्या मार्चमध्ये घेण्यात आला; मात्र जिल्ह्यातील तहसील कार्यालयांकडून लाभार्थी शेतकऱ्यांनी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयाला अद्याप प्राप्त झाली नाही.
त्यामुळे दोन महिन्यांचा कालावधी उलटून जात असला तरी, जिल्ह्यातील एपीएल रेशनकार्डधारक ३९ हजार ४३९ शेतकरी कुटुंबातील १ लाख ९२ हजार ३७५ लाभार्थींच्या खात्यात १५० रुपयांची रक्कम जमा होणे अद्याप बाकी आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील शेतकरी लाभार्थींच्या खात्यात प्रत्येकी १५० रुपये अनुदानाची रक्कम जमा होणार तरी कधी, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.
सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत अंत्योदय अन्न योजना, प्राधान्य कुटुंबातील रेशन कार्डधारक लाभार्थींसह एपीएल केशरी रेशन कार्डधारक शेतकरी लाभार्थींना दरमहा रेशन दुकानांमधून सवलतीच्या दरात अन्नधान्याचे वितरण करण्यात येत होते. त्यामध्ये गेल्या जानेवारी २०२३ पासून अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंबातील रेशन कार्डधारक लाभार्थींना दरमहा मोफत अन्नधान्याचे वितरण करण्यात येत असून, एपीएल केशरी रेशन कार्डधारक शेतकरी लाभार्थींना गेल्या सहा महिन्यांपासून रेशन दुकानांमधून मिळणाऱ्या अन्नधान्याचा लाभ बंद करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर एपीएल शेतकरी रेशन कार्डधारक लाभार्थींना धान्याऐवजी प्रतिमहा प्रतिव्यक्ती १५० रुपये देण्याचा निर्णय शासनाने गत मार्च महिन्याच्या प्रारंभी घेतला. त्यानुसार जानेवारी २०२३ पासून दरमहा प्रत्येकी १५० रुपये अनुदानाची रक्कम थेट लाभार्थींच्या बॅंक खात्यात जमा करावयाची आहे; परंतु दोन महिन्यांचा कालावधी उलटून जात असताना, जिल्ह्यातील एपीएल शेतकरी कुटुंबातील लाभार्थींच्या खात्यात दरमहा १५० रुपयांची रक्कम जमा करण्याची प्रक्रिया अद्याप सुरु करण्यात आली नाही. त्यामुळे जिल्ह्यातील ३९ हजार ४३९ एपीएल शेतकरी कुटुंबातील १ लाख ९२ हजार ३७५ लाभार्थींना दरमहा धान्याऐवजी प्रत्येकी १५० रुपये अनुदानाचा लाभ मिळणार केव्हा मिळणार, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.
एपीएल शेतकरी कुटुंबांची अशी आहे संख्या !
तालुका कुटुंबअकोला ग्रामीण ७,०१२अकोला शहर १,२२६अकोट १०२०५बाळापूर २,०७०
बार्शीटाकळी २,४७२
मूर्तिजापूर ७,५५०
पातूर २,३१२
तेल्हारा ६,५९२