पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाची कारवाई
अकोला : रामदासपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लक्कडगंज परिसरातील एका घरातून अमली पदार्थ असलेल्या भांगची अवैधरित्या विक्री सुरू असल्याच्या माहितीवरून पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या विशेष पथकाने रविवारी रात्री उशिरा छापा टाकला. या घरातून सुमारे एक किलो ५०० ग्रॅम भांग जप्त करण्यात आली आहे. यासोबतच दुचाकी व भांगेचे बनविलेले चॉकलेट पोलिसांनी जप्त केले.
लकडगंज येथील रहिवासी मनोज हरकदास बडोदे (वय ४२ वर्ष) हा त्यांच्या राहत्या घरातून भांगेची अवैधरित्या विक्री करीत असल्याची माहिती पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या विशेष पथकाचे प्रमुख विलास पाटील यांना मिळाली. या माहितीवरून त्यांनी पाळत ठेवून बनावट ग्राहक पाठवून मनोज बडोदे यांच्या घरात रविवारी रात्री उशिरा छापा टाकला. त्याच्या घरातून एक किलो ५०० ग्राम भांग तसेच भांगेचे चॉकलेट बनविलेल्या तेरा पुड्या व दुचाकी असा एकूण सुमारे ४५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या आरोपीविरुद्ध रामदासपेठ पोलीस ठाण्यात दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक मोनिका राऊत, शहर पोलीस उपाधीक्षक सचिन कदम यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाचे प्रमुख विलास पाटील व त्यांच्या पथकाने केली.