अकोला: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रिक्षाचालकांना एक वेळ अर्थसाहाय्य म्हणून प्रत्येकी १ हजार ५०० रुपयांचे मानधन देण्याचा शासनाने निर्णय घेतला असून, मानधनाची रक्कम थेट रिक्षाचालकांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे. त्यासाठी विकसित करण्यात आलेल्या संगणक प्रणालीवर परवानाधारक रिक्षाचालकांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावे लागणार आहेत.
मानधनासाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करताना परवानधारक रिक्षाचालकांना येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयातील मदत कक्ष सर्व कार्यालयीन दिवसांसोबतच सुटीच्या दिवशीही सुरू राहणार आहे. ऑनलाईन अर्ज सादर केल्यानंतर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत अर्जातील नमूद तपशिलाची पडताळणी करण्यात येणार असून, सत्यता तपासल्यानंतर ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज मंजूर करण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर परवानाधारक लाभार्थी रिक्षाचालकांच्या बँक खात्यात प्रत्येकी १ हजार ५०० रुपयेप्रमाणे मानधनाची रक्कम शासनाकडून जमा करण्यात येणार आहे, असे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी ज्ञानेश्वर हिरडे यांनी कळविले आहे.