गणेश मापारी /मूर्तिजापूर:मूर्तिजापूर तालुक्यातील जमिनीसह खारपाणपट्टय़ातील जमीन सिंचनाखाली यावी, याकरिता उभारण्यात आलेले तीनही प्रकल्प मागील सात वर्षांपासून पांढरा हत्ती ठरले आहेत. कोट्यवधी रुपये खर्च करूनही शेतकर्यांच्या शेतात पाणी न पोहोचल्याचे धक्कादायक वास्तव जनमंच शोधयात्रेच्या मोहिमेदरम्यान उजेडात आले आहे.विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ नागपूर अंतर्गत मूर्तिजापूर तालुक्यात उमा बॅरेज प्रकल्प, घुंगशी बॅरेज मध्यम प्रकल्प आणि काटेपूर्णा बॅरेज प्रकल्प असे तीन प्रकल्प मंजूर करण्यात आले आहेत. या तीनही प्रकल्पाचे काम पूर्ण झाल्यानंतर खारपाणपट्टय़ातील काही गावांसह मूर्तिजापूर तालुक्यातील एकूण १६ हजार ४0३ हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे. त्यामुळे या प्रकल्पाचा हजारो शेतकर्यांना फायदा होणार आहे. परंतु, तीनही प्रकल्प विहित मुदतीत पूर्ण झालेले नाहीत. सदर प्रकल्प रखडल्याने जनमंच सिंचन शोध यात्रेच्या वतीने रविवारी संबंधित तीनही प्रकल्पावर शोध यात्रा काढण्यात आली. या प्रकल्पांच्या कामावर कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले असून, अद्याप एकाही प्रकल्पाचे काम पूर्ण झालेले नाही. विशेष म्हणजे काम पूर्ण होण्याचा कालावधी तीनही प्रकल्पांनी ओलांडला आहे. जनमंच सिंचन शोध यात्रेच्या चमूने तिन्ही प्रकल्पांची पाहणी करून शेतकरी व अधिकारी यांचा संवाद घडवून आणला. या संवादामध्ये अनेक धक्कादायक बाबी उजेडात आल्या. शेतकर्यांना सिंचनाची सोय त्वरित व्हावी, यासाठी जनमंच प्रयत्न करणार असल्याचे जनमंचचे अध्यक्ष अँड. अनिल किलोर, प्रा. शरद पाटील यांनी सांगितले. अशी आहे तीन मुख्य प्रकल्पांच्या कामाची स्थितीउमा बॅरेज प्रकल्प हा प्रकल्प तापी खोर्यात पूर्णा नदीची उपनदी असलेल्या उमा नदीवर प्रस्तावित आहे. या प्रकल्पाचे काम २00९ पासून सुरू झाले असून, २३७.२३ कोटी रुपयांचा खर्च या प्रकल्पासाठी मंजूर आहे. मे. वैष्णवी कन्स्ट्रक्शन अँन्ड टीबीपीआर इन्फ्रा प्रोजेक्ट लि.(जेव्ही) या कंपनीस प्रकल्पाचे काम देण्यात आले आहे. सदर कंपनीने काम बंद केल्यामुळे या कंत्राटदारास ७ नोव्हेंबर २0१४ पासून ३१ ऑगस्ट २0१५ पर्यंत प्रतिदिन ५0 हजार रुपये आणि १ सप्टेंबरपासून एक लाख रुपये प्रतिदिन या प्रमाणे दंड आकारण्यात आला आहे. विशेष म्हणजे दंडाची वसुली करण्यात आली नसून, अद्यापही प्रकल्पाचे काम बंद आहे.काटेपूर्णा बॅरेज प्रकल्पकाटेपूर्णा बॅरेज प्रकल्प मंगरूळ कांबे या गावाजवळ प्रस्तावित असून, ३९८.८९ कोटी रुपयांचा सुधारित प्रस्ताव या प्रकल्पासाठी सादर करण्यात आला आहे. या प्रकल्पाचे संकल्प चित्र मंजूर करण्यासाठी तीन वर्षांचा प्रदीर्घ कालावधी लागला आहे. त्यामुळे तीन वर्ष या प्रकल्पाचे काम बंद राहिले. या प्रकल्पाच्या कालव्यासाठी लागणारी जमीन अद्याप घेण्यात आली नाही. सदर प्रकल्प २0१९ पर्यंत पूर्णत्वास येणार असल्याचे संबंधित कार्यकारी अभियंता सांगतात.घुंगशी बॅरेज प्रकल्प खारपाणपट्टय़ातील जमिनीकरिता हा महत्त्वाचा प्रकल्प आहे. ३८९.९१ कोटी रुपयांचा सुधारित प्रशासकीय मान्यतेचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. आतापर्यंत या प्रकल्पासाठी २७७ कोटी रुपये खर्च करण्यात आले असून, अद्यापही काम पूर्ण झालेले नाही. पाइपलाइनचा प्रस्ताव महामंडळाकडे सादर करण्यात आला असून, भूसंपादनाची प्रक्रियाही थांबलेली आहे. २0१९ पर्यंत शेतकर्यांना या प्रकल्पाचा लाभ मिळण्याची शक्यता आहे.
१६ हजार हेक्टर शेतीचा घसा कोरडाच!
By admin | Published: January 11, 2016 1:57 AM