नितीन गव्हाळे । लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीची तारीख लवकरच जाहीर होणार आहे. आतापर्यंत विद्यापीठाकडे ऑनलाइन किंवा ऑफलाइन पद्धतीने १६ हजार ७१४ पदवीधरांनी नोंदणी केली आहे. महिनाभरापूर्वी पदवीधरांच्या नोंदणीचे काम काही संघटनांच्या प्रतिनिधींमार्फत जोरात सुरू होते. अनेक इच्छुक उमेदवारांनी सिनेट निवडणुकीत उतरण्यासाठी जोरदार मोर्चे बांधणी केली आहे. अमरावती विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीच्या निमित्ताने पदवीधारकांकडून ऑनलाइन, ऑफलाइन पद्धतीने नोंदणीकृत पदवीधर म्हणून नाव नोंदणीसाठी १६ सप्टेंबरपर्यंत मुदत देण्यात आली. यादरम्यान अमरावती विद्यापीठांतर्गत येणार्या हजारो पदवीधारकांनी नावाची नोंदणी केली. सिनेट निवडणुकीमध्ये पाचही जिल्हय़ांतून अनेक उमेदवार इच्छुक आहेत. सिनेटच्या निवडणुकीत उतरण्यापूर्वी आवश्यक संख्याबळ आपल्या बाजूने असावे किंवा पदवीधारक मतदारांचा विश्वास जिंकण्याच्या उद्देशाने अनेकांनी पदवीधारकांचे नाव नोंदणी करण्यासाठी पुढाकार घेतला होता. एवढेच नाही, तर इच्छुक उमेदवारांसह त्यांच्या कार्यकर्त्यांनीसुद्धा पदवीधारकांच्या घरी जाऊन त्यांचे ऑफलाइन अर्ज भरले होते. यंदा अमरावती आणि अकोला जिल्हय़ात सर्वाधिक नोंदणी झाली आहे. विद्यापीठामध्ये जवळपास ४0 सदस्य असतात; त्यात तीन विद्यापीठ शिक्षक, दहा प्राध्यापक, दहा पदवीधर, दहा प्राचार्य आणि आठ संस्थाचालकांचा समावेश असतो. हे सिनेट सदस्य अमरावती विद्यापीठातील प्रशासकीय कामकाजावर नियंत्रण ठेवण्यासोबतच अर्थसंकल्प, विद्यापीठाची धोरणे यासह वेगवेगळय़ा समस्या सोडविण्यासाठी काम करतात. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर हे सध्या बाहेरगावी असल्यामुळे सिनेट निवडणुकीची तारीख निश्चित करण्यात आली नाही. ते परत आल्यानंतरच निवडणुकीची तारीख जाहीर करण्यात येईल.
नोंदणी केलेल्या पदवीधरांची संख्याअमरावती ८२६४अकोला ३७९३बुलडाणा ७५३यवतमाळ ३१२९वाशिम ७७१
सिनेट निवडणुकीसाठी अमरावती विद्यापीठात १६ हजार ७१४ पदवीधारकांची नोंदणी झाली आहे. लवकरच निवडणुकीचा कार्यक्रम आणि निश्चित तारीख ठरणार आहे. पाचही जिल्हय़ांमध्ये ६३ मतदान केंद्र निश्चित करण्यात आले आहेत. - डॉ. अजय देशमुख, कुलसचिव संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ