अकोला: वाढते तापमान आणि हुलकावणी देत असलेल्या पावसाचे ऋृतुचक्र नियमित ठेवायचे असेल तर वृक्षारोपणाशिवाय पर्याय नाही. ही बाब अकोलेकरांना पटवून सांगण्यासोबत मनपा स्थायी समिती सभापती विनोद मापारी यांनी वृक्षारोपण अभियान सुरू केले आहे. आम्ही अकोलेकर... या बॅनरखाली दोन दिवसांपासून सुरू करण्यात आलेल्या अभियानास अकोलेकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत १,६५० वृक्षांचे रोपण केले.केवळ वृक्षारोपणच नव्हे तर वृक्ष संवर्धनाची जबाबदारी प्रत्येकाने पार पाडावी, असे आवाहन करण्यात आल्याने अकोल्यातील निसर्ग संवर्धन करण्याकरिता अनेक सामाजिक संघटना पुढे आल्यात. मापारी यांचा मित्र परिवार, गायत्री परिवार, रोटरी क्लब आॅफ अकोला, अॅग्रोसिटी, मनपा प्रभाग क्र.२० मधील महिला मंडळ, स्वस्तिक गृह निर्माण सोसायटी, आस्था योग फाउंडेशन, निसर्ग वैभव संस्था, अकोला ग्रीन क्लब आर्मी, हॉकी अकोला असोसिएशन, पहाट बहूद्देशीय संस्था,आयएमए अकोला, शुभम करोती फाउंडेशन, जय बाभळेश्वर ग्रुप डाबकी रोड, मोरेश्वर फाउंडेशन या सामाजिक संघटनांनी वेळापत्रक तयार करून दोन दिवसात १,६५० वृक्षांचे रोपण केले. विशेष म्हणजे ही मोहीम सुरू असताना कार्यकर्त्यांच्या जेवणाची सुविधा एका मंगल कार्यालयात दररोज करण्यात येत आहे. दोन दिवसांत १,६५० वृक्षांचे रोपण महानगरातील आयटीआय कॉलेज परिसरात, गोरक्षण मार्गावरील नेहरू पार्क समोरील मेडिकल कर्मचारी वसाहतीत, गोरक्षण मार्गावरी कॉलनी परिसरात, बिसेन यांच्या खुल्या प्लॉटमध्ये, माधव नगर, हनुमान मंदिर, निवारा कॉलनी, संतोष नगरातील शिव हनुमान मंदिर परिसरात, संत नगर, खडकी येथे, टीटीएन कॉलेज जवळ, केशव नगर परिसरातील बाळ काळणे यांच्या घरासमोर, दुर्गादेवी मंदिराजवळ, जुने खेतान नगर परिसरात, गणपती मंदिर, कौलखेड स्मशानभूमी परिसरात करण्यात आले.