संतोषकुमार गवई
पातूर : तालुक्यात अद्यापही जोरदार पावसाची प्रतीक्षा असून, जुलै महिन्याच्या अखेरपर्यंत केवळ २८१.८ मिमी पावसाची नोंद झाली आहे. यंदा सरासरीपेक्षा १६.६ टक्के तूट निर्माण झाली असून, अद्यापही तालुक्यातील प्रकल्प, तलावाची पातळी वाढली नसल्याचे चित्र आहे. गतवर्षी जुलै महिन्याच्या अखेरपर्यंत ४०१.३ मिमी पावसाची नोंद करण्यात आली होती. जुलै अखेरपर्यंत तालुक्यात सरसरी ३३७.८ मिमी. पाऊस बरसतो.
तालुक्यातील जून महिन्यात मृग नक्षत्राच्या प्रारंभी पावसाने हजेरी लावली; मात्र त्यानंतर पावसाने दडी मारल्याने पिके संकटात सापडली होती. तसेच तालुक्यातील सर्व जलाशयांनी तळ गाठला आहे. पाण्याची पातळी अद्यापही वाढली नसून, गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी पाऊस कमी बरसला आहे. पिकांना जीवदान मिळाले असले, तरी पिण्याच्या पाण्याची समस्या उद्भवण्याची शक्यता आहे. पावसाने दडी मारल्याने पिकांची उत्पादन क्षमता कमालीची घटली असून, गतवर्षीप्रमाणे यंदाही उडीद, मूग पीक हाताबाहेर गेले आहेत. पातूर तालुक्यातील सातत्याने कमी होत असलेली वृक्षसंपदा पर्जन्यमान घटण्यास कारणीभूत ठरत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
-----------------
गतवर्षी झाला होता ४०१.३ मिमी पाऊस
तालुक्यात गतवर्षी चांगला पाऊस बरसला होता. तालुक्यात गतवर्षी अती पावसामुळे खरीप हंगामातील मूग, सोयाबीन, उडीद पिकांचे नुकसान झाले होते. तसेच तालुक्यातील प्रकल्प, तलावांमध्ये साठा वाढला होता. गतवर्षी तालुक्यात ४०१.३ मिमी. पाऊस बरसला.
झालेला पाऊस
जून जुलै आतापर्यंत
१२०.३ मिमी १६१.५ मिमी २८१.८ मिमी.