अकोला : शहर व परिसरात कोरोनाचा प्रादूर्भाव वाढू लागताच त्याचा फटका शहर व ग्रामीण पोलीस दलाला पुन्हा बसताना दिसत आहे. या दोन्ही दलाचे मिळून सोमवारपर्यंत ५१ पोलिसांना कोरोनाची बाधा झाल्याचे चाचणीअंती स्पष्ट झाले आहे. तर आतापर्यंत अकोला जिल्हा पोलिस दलातील १४ अधिकारी आणि १५४ पोलीस कर्मचाऱ्यांना अशाप्रकारे एकूण १६८ पोलिसांना कोरोणाची बाधा झाल्याचे समोर आले आहे.
एकीकडे पुन्हा फैलावणारा कोरोनाचा प्रादूर्भाव तर दुसरीकडे कायदासुव्यवस्था राखण्याचे कर्तव्य बजावण्याची जबाबदारी पार पाडण्यासाठी पोलीस दिवसरात्र रस्त्यावर आहेत. पोलिसांच्या कामाचा ताण आता पुन्हा वाढताना दिसत आहे; मात्र अशास्थितीत कोरोनाची लागण होण्यापासून स्वत:ला सुरक्षित ठेवणे पोलिसांकरिता जिकीरीचे ठरु लागले आहे. शहराभोवती कोरोनाचा विळखा घट्ट होऊ पाहत असतानाच पोलिसांनाही या आजाराची बाधा होऊ लागली आहे. पोलीस दलातील 3 पोलीस अधिकारी व ४८ पोलीस अंमलदार आतापर्यंत कोरोनाबाधित असल्याचे आढळून आले आहेत. बाधित पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांवर उपचार सुरु आहेत. सर्वांची प्रकृती स्थिर असल्याचे पोलीस प्रशासकीय सुत्रांनी सांगितले. दरम्यान, मास्क, सामाजिक अंतर आणि सॅनिटायझरचा पुरेपुर वापरावर पुन्हा भर देण्यास सुरुवात करण्यात आली आहे.
पोलीस ठाण्यांना ‘कोरोना ॲलर्ट’
मागील वर्षाप्रमाणेच यावर्षीही सर्वच पोलीस ठाण्यांना ‘ॲलर्ट’ करत कोरोना आजाराला रोखण्यासाठी आपआपल्या पोलीस ठाण्यांमध्ये अधिकाधिक खबरदारी घेण्याच्या सुचना वरिष्ठ स्तरावरुन करण्यात आल्या आहेत. कर्मचाऱ्यांना मास्कचा नियमित वापर बंधनकारक करण्यात आला आहे.
कोरोना योद्धा पोलीस रात्रंदिवस रस्त्यावर आहेत. संचारबंदीसह दंडात्मक कारवाई करण्याची मोहीम पोलिसांकडून सुरू आहे. त्यामुळे व्यापारी, उद्योजक, ऑटोचालक, डॉक्टर, रुग्ण, कर्मचाऱ्यांसोबत पोलिसांचा थेट संपर्क येत असल्याने त्यांना कोरोणाची बाधा होण्याचा धोका अधिक आहे; मात्र तरीही अकोला पोलिसांना या पासून सुरक्षित राहण्यासाठी योग्य त्या खबरदारी घेण्याच्या सूचना करण्यात आलेले आहेत.
- जी. श्रीधर,पोलीस अधीक्षक अकोला