अकोला : पश्चिम विदर्भातील (वऱ्हाड) मध्यम व लघू मिळून ४८४ धरणात (प्रकल्प) ४ जून रोजी १४ टक्केच जलसाठा शिल्लक होता पण, मान्सूनपूर्व पावसाने जलसाठ्यात दोन टक्के वाढ झाली असून, आजमितीस त्यात १६.९९ टक्के साठा आहे. मात्र, मान्सून गायब झाल्याने शेतकऱ्यांची चिंतेत वाढ झाली आहे.पश्चिम विदर्भातील (वऱ्हाड) अकोला, बुलडाणा व वाशिम जिल्ह्यातील धरणातील जलसाठ्याची स्थिती वाईट आहे. या तीन जिल्ह्यांतील १८ धरणांपैकी सात धरणांतील जिवंत जलसाठा संपला असून, या धरणांची पातळी शून्य टक्के आहे. अकोलेकरांची लाइफलाइन असलेल्या काटेपूर्णा धरणात तर १.१८ टक्केच जलसाठा आहे. यात अर्धा गाळ असल्याने अकोलेकरांवरील जलसंकट गडद झाले आहे. याच जिल्ह्यातील मोर्णा धरणात ६.५१ टक्के, तर निर्गुणा व उमा धरणात शून्य टक्के जलसाठा आहे. बुलडाणा जिल्ह्यातील खडकपूर्णा धरणातील जलसाठा संपला असून, याच जिल्ह्यातील मस व कोराडी धरणातील जलसाठा शून्य टक्के आहे. आता तोेरणा ०.२५, तर उतावळी धरणातील पातळी १.८७ टक्के आहे. वाशिम जिल्ह्यातील सोनल धरणात शून्य टक्के आहे. बुलडाणा जिल्ह्यातील नळगंगा या मोठ्या धरणात १२.७४ टक्के, पेनटाकळी धरणात २.७० टक्के, ज्ञानगंगा मध्यम प्रकल्पात १८.२२ टक्के, पलढगमध्ये ११.०५ टक्के, मन धरणात ७.२२ टक्के जलसाठा शिल्लक आहे. वाशिम जिल्ह्यातील अडाणमध्ये ४३.१४ टक्के, तर एकबुर्जी धरणात १०.७८ टक्के जलसाठा शिल्लक आहे.
वाशिम जिल्ह्यातील धरणात वाढला जलसाठा!मान्सूनपूर्व पाऊस व त्यानंतर झालेल्या पावसामुळे वाशिम जिल्ह्यातील अडाण धरणातील जलसाठा १२ टक्क्यांहून ४३.१४ टक्क्यांवर पोहोचला असून, याच जिल्ह्यातील एकबुर्जी धरणातील जलसाठा दोन टक्क्याहून १०.७८ टक्केवर पोहोचला आहे.