अकोला: पोलीस ठाण्यांमध्ये विविध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असलेल्या शहरातील १७ समाजकंटकांना जिल्ह्यातून तडीपार करण्यात येत असल्याचा आदेश अकोल्याचे उपविभागीय अधिकारी डॉ. नीलेश अपार यांनी सोमवारी दिला. त्यामध्ये ५ जणांना एक वर्षासाठी, ५ जणांना सहा महिन्यांसाठी आणि ७ जणांना तीन महिन्यांसाठी तडीपार करण्यात आले आहे.अकोला शहरातील पोलीस ठाण्यांमध्ये विविध स्वरूपाचे गुन्हे दाखल असलेल्या १७ समाजकंटकांना जिल्ह्यातून तडीपार करण्याचा प्रस्ताव पोलीस विभागामार्फत उपविभागीय अधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आला होता. त्यानुसार संबंधित १७ समाजकंटकांना जिल्ह्यातून तडीपार करण्यात येत असल्याचा आदेश उपविभागीय अधिकारी डॉ. अपार यांनी दिला. सिव्हिल लाइन पोलीस ठाणे अंतर्गत सूरज गजानन नाईक, उमेश अंबादास अटाळकर, डाबकी रोड पोलीस ठाणे अंतर्गत कुणाल मनोज निंदाणे, रामदासपेठ पोलीस ठाणे अंतर्गत जॉन ऊर्फ रवी रमेश गोवर व अकोट फैल पोलीस ठाणे अंतर्गत अक्षय श्रीकृष्ण तेलगोटे या पाच जणांना एक वर्षासाठी तडीपार करण्यात आले. तसेच सिव्हिल लाइन पोलीस ठाणे अंतर्गत अक्षय रामदास भगत, नागेश ब्रह्मदास खंडारे, डाबकी रोड पोलीस ठाणे अंतर्गत सचिन वाल्मीक खंडारे, सोनू भिकाजी मानकर व अकोट फैल पोलीस ठाणे अंतर्गत सचिन मुकुंद बलखंडे या पाच जणांना सहा महिन्यांसाठी तडीपार करण्यात आले आहे. तर डाबकी रोड पोलीस ठाणे अंतर्गत अलिमशहा कलीमशहा, लड्ड्या ऊर्फ उमर शेख हारुण, शेख कासम शेख इब्राहिम, एमआयडीसी पोलीस ठाणे अंतर्गत सुबोध राजेंद्र ठोके, जूने शहर पोलीस ठाणे अंतर्गत सुनील उत्तमराव पाचपोर, प्रशांत नानासाहेब खोरे व अकोट फल पोलीस ठाणे अंतर्गत प्रकाश बळीराम वानखडे या सात जणांना तीन महिन्यांसाठी जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे.