अकोला : यंदाच्या खरीप हंगामात कृषी विभागाच्या जिल्ह्यातील भरारी पथकांमार्फत बियाणे विक्रीच्या दुकानांची तपासणी करण्यात येत असून, त्यामध्ये जून अखेरपर्यंत जिल्ह्यात विविध बियाण्यांचे १७० नमुने घेण्यात आले असून, घेतलेले बियाण्यांचे नमुने तपासणीसाठी नागपूर येथील बीज परीक्षण प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत.
खरीप हंगामासाठी बियाणे खरेदीत शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये, यासाठी कृषी विभागामार्फत जिल्हयातील बियाणे विक्रीच्या दुकानांची तपासणी करण्यासाठी तालुका व जिल्हास्तरावर भरारी पथके गठित करण्यात आली आहेत. या पथकांमार्फत गत मे अखेरपासून जिल्ह्यातील बियाणे विक्रीच्या दुकानांची तपासणी आणि बियाण्यांचे नमुने घेण्याची मोहीम सुरू करण्यात आली. त्यामध्ये जून अखेरपर्यंत जिल्ह्यातील सातही तालुक्यांत तालुकास्तरीय भरारी पथकांमार्फत १२९ आणि जिल्हास्तरीय पथकामार्फत ४१ असे बियाण्यांचे एकूण १७० नमुने घेण्यात आले. विविध बियाण्यांचे घेण्यात आलेले नमुने जिल्हा परिषद कृषी विभागामार्फत नागपूर येथील बीज परीक्षण प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.
तालुका व जिल्हास्तरीय पथकांनी असे घेतले बियाण्यांचे नमुने !
तालुका नमुने
अकोट २७
अकोला ०८
बाळापूर १६
मूर्तिजापूर १४
बार्शिटाकळी २३
पातूर २०
तेल्हारा २१
जिल्हास्तरीय ४१
.............................................................
एकूण १७०
‘या’ पिकांच्या बियाण्याचे घेतले नमुने !
कृषी विभागाच्या तालुकास्तरीय व जिल्हास्तरीय भरारी पथकांमार्फत विविध बियाण्यांचे १७० नमुने घेण्यात आले. त्यामध्ये सोयाबीन, कपाशी, मूग, उडीद व तूर इत्यादी पिकांच्या बियाणे नमुन्यांचा समावेश आहे.
खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर कृषी विभागाच्या जिल्ह्यातील तालुकास्तरीय व जिल्हास्तरीय भरारी पथकांमार्फत बियाणे विक्रीच्या दुकानांची तपासणी करण्यात येत आहे. तपासणीत जून अखेरपर्यंत जिल्ह्यात बियाण्यांचे १७० नमुने घेण्यात आले. घेतलेले बियाण्यांचे नमुने तपासणीसाठी नागपूर येथील बीज परीक्षण प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत.
- मिलिंद जंजाळ
मोहीम अधिकारी, कृषी विभाग, जिल्हा परिषद, अकोला.