अकोला: प्रज्ञावंत विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्यांना सर्वोत्तम शिक्षण मिळावे, आर्थिक साहाय्य व्हावे, या दृष्टिकोनातून महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्यावतीने रविवारी राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षेचे आयोजन केले होते. १७२५ विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा दिली.शहरातील न्यू इंग्लिश हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, ज्युबिली इंग्लिश स्कूल, होलीक्रॉस हायस्कूल, जागृती विद्यालय, भारत विद्यालय, भाऊसाहेब पोटे विद्यालय अकोट या सहा केंद्रांवर ही परीक्षा दिली. विद्यार्थ्यांनी बौद्धिक क्षमता चाचणी, शालेय क्षमता चाचणीतील प्रश्न सोडविले. परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांना कार्यकारण भाव, विश्लेषण, संकलनावर आधारित १00 बहुपर्यायी वस्तुनिष्ठ १00 गुणांचे प्रश्न विचारण्यात आले. नववी, दहावीच्या नवीन अभ्यासक्रमावर आधारित सामान्य विज्ञान ४0 गुण, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, समाजशास्त्र, इतिहास, राज्यशास्त्र, गणित, भूमिती असे १00 प्रश्न विचारण्यात आले. परीक्षेचे केंद्र संचालक म्हणून माधव मुन्शी, सुनील भालेराव, पी.जी. राऊत, अरुण लौटे, मनीषा अभ्यंकर, प्रवीण रावणकार यांनी काम पाहिले. रविवारी परीक्षा केंद्रांना शिक्षणाधिकारी प्रकाश मुकुंद, उपशिक्षणाधिकारी दिनेश अवचार, देवेंद्र अवचार, जिल्हा विज्ञान पर्यवेक्षक अरविंद जाधव, शब्बीर हुसैन, जिल्हा विज्ञान अध्यापक मंडळाचे अध्यक्ष प्रा. डॉ. रवींद्र भास्कर यांनी भेटी दिल्या. (प्रतिनिधी)