वाशिम : २0१0-११ चा आर्थीक वर्षामध्ये मंजूर झालेल्या वाशिम जिल्हयातील १७३ अंगणवाडयाचे बांधकाम मुदत संपल्यानंतर झाल्याने १७३ अंगणवाड्यांच्या बांधकाम निधीचे २ कोटी ५९ लाख ७४ हजार ७४0चा निधी शासनाकडे अडकून पडल्याने, त्यासर्व ग्रामपंचायती अडचणीत आल्या आहेत. वाशिम जिल्हयामध्ये २0१0-११ या आर्थिक वर्षात डिपीडीसीच्या ३९ व नाबार्डच्या १३४ अशा एकूण १७३ अंणगवाड्या मंजूर झाल्या होत्या. अंगणवाडी बांधकामासाठी ६ कोटी ९२ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला. त्यापैकी २0१0-११ या आर्थिक वर्षामध्ये ४ कोटी ३१ लाख ९३ हजार २६0 रुपयाचा निधी मुदतीत खर्च झाला. परंतु या सर्व १७३ आंगणवाडयाचे बांधकाम मुदतीत पुर्ण न झाल्याने राहीलेले बांधकाम मुदतीनंतर पूर्ण केल्याने १७३ अंगणवाड्यांचा २ कोटी ५९ लाख ७४ हजार ७४0 रुपयाचा निधी संबंधित ग्रामपंचायतीला मिळालाच नाही. अखर्चीत निधी ग्राम पंचायतीला वितरीत करण्यासाठी शासनाची परवानगी घेणे गरजेचे आहे.
जिल्हा परिषदेने त्यासाठी शासनाची परवानगी मागीतली आहे. मात्र आवश्यक परवानगी अद्यापपर्यंत न मिळाल्याने हे प्रकरण जैसे थे आहे. दरम्यान शासनाकडे अडकलेल्या निधीमुळे ग्रामपंचायती अडचणीत आल्या आहेत. यासंदर्भात जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यपालन अधिकारी योगेश जवादे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी मुदतीनंतर बांधकाम झालेल्या अंगणवाडयांच्या निधी संदर्भात कारणांसह अर्थ विभागाकडे माहिती देण्यात आली असल्याचे सांगीतले. मात्र अद्याप या संदर्भात राज्य शासनाकडून आजतागायत कोणतेही दिशा निर्देश प्राप्त झाले नाहीत. तसेच विस्तार अधिकारी तुषार जाधव यांनी १७३ अंगणवाडया राहीलेला निधी व खर्च करण्याची परवानगी मागणारा प्रस्ताव शासनाकडे केला असल्याचे सांगीतले. निधीसाठी पाठपुरावा सुध्दा संबधितांकडे केल्या जात असल्याचे त्यांनी सांगीतले.