अकोला: जिल्ह्यात प्रतिबंधित जप्त केलेला गुटखा शनिवारी दुपारी खडकी परिसरात अन्न व औषध प्रशासनाने नष्ट केला. नष्ट केलेल्या गुटख्याची किंमत १ कोटी ८७ लाख रुपये होती.राज्यात गुटखा विक्रीस बंदी असल्यानंतरही परराज्यातून जिल्हय़ात मोठय़ा प्रमाणात गुटखा येतो. सर्वाधिक गुटखा मध्यप्रदेशातून, उत्तर प्रदेश, गुजरात आदी राज्यातून आणला जातो. अकोल्यातील गुटखा माफिया हे किरकोळ व्यावसायिक, पानपट्टय़ांवर गुटखा, सुगंधित तंबाखूचे वितरण करतात. काही वर्षांपूर्वी अन्न व औषध प्रशासनाच्या आयुक्तांनी पोलीस दलाला गुटखा जप्त करण्याच्या कारवाया करण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले होते. त्याला प्रतिसाद देत पोलिसांनी गुटखा माफियांविरुद्ध कारवायांचा धडाका सुरू केला होता. जिल्हय़ात सर्वाधिक कारवाया पोलिसांनीच केल्या. अन्न व औषध प्रशासन तर कागद काळे करण्यापुरतेच कर्तव्य बजावताना दिसून येतात. सद्यस्थितीतही शहरात मोठय़ा प्रमाणात परप्रांतातून गुटखा येतो; परंतु गुटखा माफियांवर कारवाई करण्यात येत नाही. अधूनमधून पोलिसांकडूनच शहरात सुरू असलेल्या गुटखा विक्रेते, माफियांवर छापे घालून कारवाई करण्यात येते. पुढील कारवाईसाठी नंतर गुटखा जप्तीचे प्रकरण अन्न व औषध प्रशासनाकडे वर्ग करण्यात येते. अन्न व औषध विभागाचे अधिकारी, कर्मचारी पोलिसांकडून गुटखा जप्त करून आरोपींविरुद्ध कारवाई करण्यासाठी पुढाकार घेतात.
१.७५ कोटी रुपयांचा गुटखा जाळला
By admin | Published: May 07, 2017 2:39 AM