- संतोष येलकर
अकोला: पावसाळा सुरू होऊन दीड महिन्यांचा कालावधी उलटून गेला; मात्र जिल्ह्यात अद्यापही सार्वत्रिक दमदार पाऊस बरसला नाही. त्यामुळे जिल्ह्यातील विविध भागात पाणीटंचाईची समस्या कायम असून, पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांना पायपीट करावी लागत आहे. त्यामध्ये जिल्ह्यातील पाणीटंचाईग्रस्त १४८ गावांसाठी १५ जुलैपर्यंत १७८ खासगी विहीर व बोअरचे अधिग्रहण करण्यात आले असून, अधिग्रहित करण्यात आलेल्या विहीर व बोअरद्वारे पाणीटंचाईग्रस्त गावांना पाणीपुरवठा करण्यात येत आहे.यावर्षीचा पावसाळा सुरू होऊन दीड महिन्यांचा कालावधी उलटून गेला; परंतु जिल्ह्यात सार्वत्रिक जोरदार पावसाने हजेरी लावली नाही. त्यामुळे जिल्ह्यातील नदी-नाले अद्यापही कोरडी पडली असून, धरणांमधील जलसाठ्यांतही वाढ झाली नाही. पावसाने दांडी मारल्याच्या स्थितीत जिल्ह्यातील विविध भागात पाणीटंचाईची समस्या कायम असून, पाणीटंचाईग्रस्त गावांमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी पावसाळ्यातही ग्रामस्थांना पायपीट करावी लागत आहे. त्यानुषंगाने, जिल्ह्यातील सातही तालुक्यातील पाणीटंचाईग्रस्त १४८ गावांसाठी १५ जुलैपर्यंत जिल्हा प्रशासनामार्फत १७८ खासगी विहीर व बोअरचे अधिग्रहण करण्यात आले आहे. त्यामध्ये ६० विहिरी व ११८ बोअरचा समावेश आहे. अधिग्रहित करण्यात आलेल्या खासगी विहीर व बोअरद्वारे पाणीटंचाईग्रस्त गावांना पाणीपुरवठा करण्यात येत आहे. पावसाळ्यातही अधिग्रहित करण्यात आलेल्या खासगी विहीर व बोअरच्या पाण्यावर पाणीटंचाईग्रस्त गावांतील ग्रामस्थांना तहान भागवावी लागत आहे.दीड महिन्यात सरासरी केवळ १६६.३ मि.मी. पाऊस!जिल्ह्यात १ जून ते १५ जुलैपर्यंत सरासरी २४७.१ मि.मी. पाऊस अपेक्षित आहे. त्या तुलनेत यावर्षीच्या पावसाळ्यात १५ जुलैपर्यंत दीड महिन्याच्या कालावधीत जिल्ह्यात सरासरी केवळ १६६.३ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली आहे. त्यानुषंगाने जिल्ह्यातील धरणे, तलाव, नदी-नाल्यांमध्ये पुरेसा जलसाठा उपलब्ध होण्यासाठी सार्वत्रिक दमदार पाऊस केव्हा बरसणार, याबाबत प्रतीक्षा केली जात आहे.