अकोला : उन्हाळी सुट्यांमध्ये प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेता दक्षीण मध्य रेल्वेने काचीगुडा-हिसार-काचीगुडा साप्ताहिक विशेष एक्स्प्रेस चालविण्याचा निर्णय घेतला आहे.
२ मे ते ३० जून या कालावधीत या एक्स्प्रेसच्या अप व डाऊन प्रत्येकी नऊ अशा एकूण १८ फेऱ्या होणार असून, दोन्ही बाजुंनी अकोला स्थानकावर थांबा देण्यात आल्याने अकोलेकर प्रवाशांची सोय होणार आहे.दक्षीण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाकडून प्राप्त माहितीनुसार, गाडी क्र. ०७०५५ काचीगुडा-हिसार विशेष एक्स्प्रेस २ मे ते २७ जून या कालावधीत दर गुरुवारी प्रस्थान स्थानकावरून १५:१५ वाजता रवाना होऊन तिसऱ्या दिवशी हिसार येथे ११:१५ वाजता पोहोचणार आहे.
ही गाडी दर शुक्रवारी ,३:२५ वाजता अकोला स्थानकावर येणार आहे. परतीच्या प्रवासात गाडी क्र. ०७०५६ हिसार-काचीगुडा विशेष एक्स्प्रेस ५ मे ते ३० जून या कालावधीत दर रविवारी प्रस्थान स्थानकावरून १२:३५ वाजता रवाना होऊन तिसऱ्या दिवशी मंगळवारी ०७:३० वाजता काचीगुडा येथे पोहोचणार आहे. ही गाडी दर सोमवारी २०:०० वाजता अकोला स्थानकावर येणार आहे.