अकोला : अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १८ संचालक पदांसाठी घेण्यात येत असलेल्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत (गुरुवार) १0५ उमेदवारांनी ११५ उमेदवारी अर्ज उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकार्यांकडे दाखल केले. उमेदवारी अर्जांची छाननी शनिवार, १ ऑगस्ट रोजी होणार आहे. अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सेवा सहकारी मतदारसंघातून ११, ग्रामपंचायत मतदारसंघातून ४, व्यापारी व अडते मतदारसंघातून २ आणि हमाल व मापारी मतदारसंघातून १ अशा एकूण १८ संचालक पदांसाठी निवडणूक घेण्यात येत आहे. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा गुरुवार, ३0 जुलै रोजी शेवटचा दिवस होता. चारही मतदारसंघातून गुरुवारपर्यंत एकूण १0५ उमेदवारांनी ११५ उमेदवारी अर्ज उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी संजय खडसे यांच्याकडे दाखल केले. उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्याने, गुरुवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अकोला उपविभागीय अधिकारी कार्यालयात उमेदवारांची गर्दी झाली होती. उमेदवारांनी दाखल केलेल्या उमेदवारी अर्जांची छाननी १ ऑगस्ट रोजी करण्यात येणार आहे, तर उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत १४ ऑगस्टपर्यंत आहे. २२ ऑगस्ट रोजी उमेदवारांना चिन्ह वाटप करण्यात येणार असून, ६ सप्टेंबर रोजी मतदान घेण्यात येणार आहे.
१८ जागांसाठी ११५ उमेदवारी अर्ज दाखल
By admin | Published: July 31, 2015 1:52 AM